पिंपरी,०१ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-घरकुलच्या माध्यमातून नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होत असून त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा, आपल्या सदनिकेची स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका भाड्याने देऊ नये अथवा विक्री करू नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून या प्रकल्पातील ३ सोसायट्यांच्या इमारती मधील एकूण १२६ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यालय अधीक्षक विष्णू भाट, कॉम्प्युटर ऑपरेटर रेवती अडूरकर, लिपिक योगिता जाधव यांच्यासह झोनिपू विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच घरकुल सर्व उपस्थित होते.
नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १५४ इमारत क्र. डी ०९, सोसायटी क्र. १५५ इमारत क्र. डी- ११, सोसायटी क्र. १५६ इमारत क्र. एफ- १५ या सर्व सोसायटी अध्यक्ष यांचे अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वतःचे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे, घराचा वापर स्वतः करावा, इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा राखावी व जतन करावे. महापालिका नागरिकांना सुसज्ज सुविधा देण्यासाठी नेहमीच कार्यरत असते असेही अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले.
यावेळी अण्णा बोदडे सहाय्यक आयुक्त यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. विशेष अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर राहण्यास उत्तम शहर आहे अशा शहरात स्वतःचे घर झाले त्यामुळे निश्चित नागरिकांचे जीवनमान उंचावेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल कोथळीकर यांनी केले तर आभार विष्णु भाट यांनी मानले.