आय ऍम सुभाष, गांधी-आंबेडकर, ऑगस्ट क्रांती, रंग दे बसंती चोला या प्रसिद्ध नाटकानी केले रसिकांना मंत्रमुग्ध
मुंबई,दि.14 ऑगस्ट 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सांस्कृतिक व्यवहार मंत्रालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 22 व्या भारत रंग महोत्सवाची काल सांगता झाली. मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी, या महोत्सवाचे उद्घाटन मुंबईत रविंद्र नाटय मंदिर येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाले होते.आमच्या स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आणि त्यागाचे चित्रण करणाऱ्या आणि नामवंत दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेली नाटके या महोत्सवात सादर करण्यात आली.
आय ऍम सुभाष
चंद्रकांत द्विवेदी यांनी दिग्दर्शित केलेले आय ऍम सुभाष हे नाटक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आले. महान देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर हे नाटक आधारित आहे. नेताजींच्या विद्यार्थी ते आझाद हिंद सेना स्थापन करेपर्यंतच्या आणि नंतरच्या गूढरित्या बेपत्ता होण्यापर्यंतच्या काळातील संघर्षाचे चित्रण यात केले आहे. सुभाषबाबू यांनी प्रमुख राष्ट्रीय नेत्यांकडून प्रखर विरोध होत असतानाही देशभक्तीची भावना चेतवून लोकांच्या हृदयात कसे स्थान मिळवले इतकेच नाही तर राजकारणापासून त्यांनी स्वतःला अलिप्त करून देशाला स्वतंत्र करण्यासाठी कशी आझाद हिंद सेना स्थापन केली, हे नाटक प्रभावीपणे सांगते. सुभाषचंद्र बोस यांचे वैचारिक तत्वज्ञान, त्यांची कार्यशैली आणि त्यांची स्वप्ने दाखवण्याचा हे नाटक प्रयत्न करते.
गांधी-आंबेडकर
10 ऑगस्ट रोजी डॉक्टर मंगेश बनसोड यांचे गांधी-आंबेडकर हे नाटक सादर झाले. हे नाटक म्हणजे एकाच उद्देष्यासाठी महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वेगळ्या विचारधारांमधील आणि पद्धतीमधील द्वंद्व प्रभावीपणे सादर करणारा संदेश आहे. देश, समाज, भारतातील लोक, हिंदू-मुस्लीम, अस्पृश्यता, चातुर्वण्य व्यवस्था, हिंदुत्ववाद या मुद्यांवर महात्मा गांधी यांची स्वतःची मते होती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे याच मुद्यांकडे पहाण्याची वेगळी इच्छाशक्ती होती. हेच दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर मतभेद आणि वैचारिक संघर्षाचे कारण होते.
ऑगस्ट क्रांती
रूपेश पवार यांचे ऑगस्ट क्रांती हे नाटक 11 ऑगस्ट रोजी सादर करण्यात आले. हे नाटक 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान घडलेल्या सत्य प्रसंगांवर आधारित आहे. गांधीजींबाबत प्रामुख्याने यात कथन करण्यात आले आहे. राम मनोहर लोहिया आदी नेत्यांबद्दलही त्यात उल्लेख केला आहे. अखेरीस, संपूर्ण स्वातंत्र्यासाठी तळागाळातील लोकांचे महत्व आणि एकत्रितपणे लढण्यासाठी त्यांची प्रेरणा हे नाटक अधोरेखित करते. या प्रसंगातून काही प्रसंग निवडून ते दाखवण्याचा प्रयत्न ऑगस्ट क्रांती या नाटकातून केला आहे.
टिळक आणि आगरकर
सुनील जोशी दिग्दर्शित ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक मुंबईच्या अभिजात नाट्य संस्था आणि श्री आर्यदुर्गा क्रिएशन्सने 12 ऑगस्टला सादर केले. टिळक आणि आगरकर या नाटकाला मराठी रंगभूमीवर सोनेरी पानाचा मान मिळाला आहे. टिळक आणि आगरकरांच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात दोघांमधील मतभेद आणि त्यांची उघड मैत्री, जी हळूहळू तुटत चालली होती, त्यामुळे दोघांनी एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडले.एकाच घरात एकत्र राहून राष्ट्रसेवेची शपथ घेतल्यानंतर ‘केसरी’ आणि ‘मराठा’ वृत्तपत्रे सुरू करणारे टिळक आणि आगरकर सुरुवातीला एकत्र दिसतात.पण त्यानंतर त्यांच्या विचारांची दरी रुंदावत गेली आणि त्यांच्यात शाब्दिक वाद, मग त्यांच्यातला मत्सर; आणि त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्यानंतर दोघांच्या कुटुंबांचे एकत्रीकरण हे या नाटकातील मध्यवर्ती चित्र बनते.पण या नाटकाचा एक समान धागा म्हणजे मैत्री, जी वेळोवेळी त्यांच्या मधून जाणवते,हे सर्व पाहून प्रेक्षक थक्क होतात.
रंग दे बसंती चोला
मोहम्मद नझीर कुरेशी दिग्दर्शित ‘रंग दे बसंती चोला’ या हिंदी नाटकाचे काल महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भोपाळच्या कारवान थिएटर ग्रुपकडून सादरीकरण करण्यात आले. रंग दे बसंती चोला हे नाटक भीष्म साहनी यांनी लिहिले आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित, या नाटकाची सुरुवात, जनरल डायरच्या कोर्ट मार्शल ने होते. खेद वाटण्याऐवजी, त्याने या प्रश्नाला ठामपणे उत्तर दिले की, त्याला भारतीयांचे मनोधैर्य खच्ची करायचे आहे आणि त्याने आपले कर्तव्य बजावले. पंजाबचे वातावरण तयार करण्यासाठी नाटकात शबद आणि प्रभातफेरी यांचा समावेश केला आहे. हेमराज आणि त्याची पत्नी रट्टो यांच्या आयुष्याभोवती हे नाटक फिरते. हेमराज गांधीवादी विचारसरणीवर विश्वास ठेवतात. त्याचा मेव्हणा त्याच्या घरी येतो,तो गरम दलाचा आहे आणि त्यांच्यात एकमेकांच्या विचारसरणीवरून वाद होतात. भारतीयांची एकता भंग करण्यासाठी ब्रिटीश सैन्य आणि अधिकारी प्रत्येक वेळी सतर्क आणि सावध असतात. प्राध्यापक वाथूर सारखी काही ब्रिटिश पात्रे आहेत, जी भारतीय समर्थक आहेत आणि त्यांना क्रूरता आवडत नाही.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी “आझादी का अमृत महोत्सव – 22वा भारत रंग महोत्सव, 2022 (आझादी खंड)” आयोजित केला आहे.
22व्या भारत रंग महोत्सव, 2022 (आझादी खंड) चा एक भाग म्हणून 16 जुलै ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत दिल्ली, भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, बेंगळुरू आणि मुंबई येथे 30 नाटके दाखवली गेली.