पिंपरी 07 ऑक्टोबर 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-विक्रम कांबळे) :– नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यात महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले. या निवडणुकांच्या लागलेल्या निकालातून महाविकास आघाडी सरकार बाबत नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला असल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाची पुनरावृत्ती होईल. सत्ताधारी भाजपाला जनता नाकारेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांनी व्यक्त केला.
संजोग वाघरे पाटील पुढे म्हणाले की, ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीने यश मिळवत नागरिकांच्या मनातील स्थान पटवून दिले आहे. हाच विश्वास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत दिसून येईल.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. यांचे निकाल बुधवारी समोर आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते.
त्याचबरोबर कोरोना काळ, अतिवृष्टी यांसारख्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कामाची कसोटी या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार होती. मात्र, या निवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाली आहे. भाजपाने जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २३ जागा जिंकल्या असल्या तरी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १७ जागा आणि शिवसेनेने १२ जागां जिंकल्या आहेत. म्हणाजेच महाविकास आघाडीने एकूण ४६ जागा ताब्यात घेतल्या आहेत.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे आगामी भवितव्य समोर आले आहे. कोरोना काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तिसऱ्या लाटेला एक प्रकारे नियोजनबद्ध आरोग्य योजनांमुळे आपण रोखून धरले. या कामाची पावती जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमधून सरकारला मिळाली आहे.
महाविकास आघाडी आस्मानी संकटात लोकांसोबत गेल्या काही महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींनी मोठे संकट आपल्या समोर उभे केले होते. मात्र या संकटातही नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम आघाडी सरकारने केले. या कामाची पावती नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून सरकारला मिळाली.हीच पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही दिसणार आहे, असा विश्वास वाघेरे- पाटील यांनी व्यक्त केला आहे.