नवी दिल्ली,03सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माध्यमांतील काही घटक बातम्यांना जातीयतेचा रंग देऊन देशाचे नाव बदनाम करीत आहे, असा संताप सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केला.
वृत्तसंकेतस्थळ आणि यूट्यूबवरील बनावट बातम्यांबाबत चिंता व्यक्त करताना ही माध्यमे केवळ न्यायाधीश किंवा संस्थांचा नव्हे, तर शक्तिशाली लोकांचा आवाज ऐकतात, असे सांगितले.
मागील वर्षी निझामुद्दिन येथील मर्केझबाबत पसरल्या जाणार्या बनावट बातम्या रोखण्याचा निर्देश केंद्र सरकारला द्यावा तसेच यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करा, अशी जमात-उलेमा-ई-हिंदसह दाखल करण्यात आलेल्या काही याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा प्रमुख असलेल्या न्यायासनाने उपरोक्त निरीक्षण नोंदवले आहे.
माध्यमातील काही घटक देशातील प्रत्येक गोष्टीकडे जातीयतेच्या नजरेतून पाहतात, ही समस्या आहे. यामुळे देशाचे नाव बदनाम होते. तुम्ही खाजगी वाहिन्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न न्यायासनाने केंद्र सरकारला विचारला. आभासी स्वरूपातील मजकुराचे नियमन करण्याच्या उद्देशाने आणलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या वैधतेविरुद्ध उच्च न्यायालयांत प्रलंबित असलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याच्या मागणीसाठी केंद्राने दाखल केलेल्या याचिकेवर सहा आठवड्यांनी सुनावणी करण्यावर न्यायासनाने सहमती दाखवली.
केवळ जातीच्याच बातम्याच नाही, तर पेरलेल्या बातम्यादेखील प्रसारित केल्या जात आहेत. वृत्तसंकेतस्थळांसह आभासी स्वरूपातील मजकुराचे नियमन करण्यासाठी आयटी नियम तयार करण्यात आले आहेत, असे केंद्राच्या वतीने युक्तिवाद करताना महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनी न्यायासनास सांगितले. समाजमाध्यम केवळ शक्तिशाली आवाज ऐकतो आणि कोणतेही दायित्व न घेता न्यायाधीश आणि संस्थांच्या विरोधात काही बातम्या लिहिल्या गेल्या आहेत. संस्थांबाबत अतिशय वाईट लिहिले गेले आहे आणि हा आमचा अधिकारच असल्याचे सांगत, या माध्यमांकडून प्रतिसाद दिला जात नाही, असे न्या. सूर्य कांत आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांचा देखील समावेश असलेल्या न्यायासनाने सांगितले.
याबातमी मुळे संपुर्ण देशात काही दैनिक,न्युज चॅनल यांनी वेब पोर्टल,युट्युबर यांना टार्गेट करण्याचे काम करत आहेत.तर सर्वच मिडियाचे वेब पोर्टल असुन युट्युब देखील आहे.माञ यावर लवकर नियमावली यावी अशी अशा सर्वेच छोटे दैनिक,साप्ताहीक व नियतकालीक वाले करत आहेत.जेणे की फेक पञकारांपासुन बचाव होईल.