पिंपरी,दि.०८ मार्च २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
आज ०८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याचे सर्व सामाजिक स्तरावर स्वागत होऊ लागलेले आपण अनुभवतो आहोत. ०८ मार्च हा महिला दिन म्हणून स्वीकारण्याची मानसिकता अनुभवतो आहोत. घरात दारात , कार्यालयात, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात असतात ही निश्चितच महिलांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब मानावी लागेल.
या सकारात्मक मानसिकतेच्या मागील संघर्ष, वेळ, वर्ष याचा विचार केला असता आणि आजची महिलांची सामाजिक स्थिती पाहिली असता आपण या सकारात्मक मानसिकतेबद्दल समाधानी असावे की नाही हा गहन प्रश्न आहे.
१७ व्या शतकात देखील मेरी वोलस्टोन सारख्या महिलेने मुलींचे शिक्षण आणि जडणघडण हे पुरुषांना आवडणारे आणि पुरुषी वर्चस्व असणारे संस्कार मुलींवर का केले जातात यावर लढा देत होती.
१८ व्या शतकात मरियन या ऑस्ट्रेलियन महिलेने महिलांना नोकरी आणि महाविद्यालयीन प्रवेश देण्यासंदर्भात लढा दिला होता.
१८ व्या शतकाच्या अखेरीस न्युझीलँड मध्ये राष्ट्रीय निवडणुकीत महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी चळवळ उभारली गेली. एमिलीन आणि कॅरीलिन या ब्रिटिश महिलांनी महिलांना मूल जन्माला घालण्याचा अधिकार असावा यासाठी देखील लढा दिला.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमध्ये महिलांना नोकरी आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी ३०० निदर्शने करण्यात आली होती.
१९०८ मध्ये न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री महिला कामगार दहा तासांचा दिवस, महिलांची सुरक्षितता आणि लिंगभेद नष्ट करून समान वेतन कायद्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
थोडक्यात काय आंतरराष्ट्रीय महिला दिनाची चळवळ १७ व्या शतकापासून उभारली गेली होती ती आज २१व्या शतकात देखील चालूच आहे. तेव्हापासून विविध क्षेत्रातील शेकडो, हजारो, लाखो स्त्रीयांनी संघर्ष आणि समर्पण करून स्त्रियांसाठीच्या विविध हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी लढा दिला आहे. तेव्हा कुठे आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन एक दिवसा पुरता का होईना स्वीकारण्याची मानसिकता अनुभवतो आहोत. हे ही नसे थोडके…..
वास्तविक पाहता ०८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन ठरवला गेला. याबाबत काही ठोस पुरावे नाहीत. किंबहुना काही वाद प्रवाद आहेत कारण अशी कोणतीही घटना ०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन निश्चित होण्यासाठी कारणीभूत ठरलेली नोंद नाही. परन्तु १९ व्या शतकापर्यंत महिलांना असणारा दुय्यम दर्जा, उपभोग्य वस्तू म्हणून असलेली त्यांची ओळख, कष्ट करण्याचे साधन म्हणून बघण्याची मानसिकता आणि त्यांना अधिकारापासून वंचित ठेवण्याची भूमिका यावर वारंवार होणारे निदर्शने, चळवळी यांच्या माध्यमातून महिलांमध्ये येणारी जागरुकता आणि या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी सारख्या देशांनी पुढाकार घेऊन १९१४ मध्ये भरवलेली आंतरराष्ट्रीय महिला परिषद.
या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या शिफारशीनुसारच ०८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी होऊ लागली. १९४३ साली भारतामध्ये ०८ मार्च हा प्रथम महिला दिन साजरा केला गेला. तदनंतर १९७१ मध्ये पुणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला आणि तिच्या पाठोपाठ भारताच्या कानाकोपऱ्यात सर्व राज्यात, सर्व गावात, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात, किंबहुना घराघरांमधून देखील ०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होऊ लागला. हा दिवस महिलांच्या दृष्टीने मानाचा सन्मानाचा दिवस ठरला. ही देखील मोठी क्रांतीच म्हणावी लागेल.
मतदानाचा अधिकार मिळाला, शैक्षणिक समानता मिळाली, नोकऱ्या मिळाल्या, सामाजिक राजकीय समानता मिळाली, निवडणुकांमध्ये सहभाग मिळाला, मालमत्तेवरील अधिकार मिळाला, अनेक गोष्टी मिळाल्या.
बदलत्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीनुसार महिलांच्या प्रश्नाचे स्वरूप बदलत गेले. त्यानुसार स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.
आपण म्हणतो महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण झाले पाहिजे. माझ्या मते प्रत्येक महिला सबला आणि सक्षमच असते. गरज असते ते तिला स्वतःमधली क्षमता ओळखण्याची, गरज असते स्वतामधला आत्मविश्वास ओळखण्याची, स्वतःमधील सुप्त शक्तीला बाहेर काढण्याची. माझ्यामते यासाठी कोणताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीचा निकष नाही. कारण इसवी सनापूर्वी गार्गी, मैत्रयी, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारखी महिला नेतृत्व असो किंवा इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, मदर तेरेसा, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, डॉ. ॲनी बेझंट किंवा सुनिता विल्यम, किरण बेदी, कल्पना चावला, मेरी कोम, सिंधुताई सपकाळ, साधनाताई आमटे यांसारखी सर्व महिला नेतृत्व त्या त्या परिस्थितीत परिस्थितीनुसार सबल, सक्षम आणि समर्थच होती आणि आहेत.
आजही समाजातल्या अगदी तळागळामध्ये देखील सामान्य महिलांचे नेतृत्व करणाऱ्या असंख्य महिला सामाजिक संस्था आणि बचत गट प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या आपण पाहतो आहे. अभाव आहे महिलांच्या सामाजिक स्थान स्वीकार करण्याच्या मानसिकतेचा !
आजही काही अपवाद सोडता महिलांच्या सामाजिक दर्जा दुय्यम समजला जातो. लिंगभेदाचा पगडा आजही समाजामध्ये असल्यामुळे महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागते. कौटुंबिक अत्याचारा बरोबरच सामाजिक आणि राजकीय अत्याचाराचे प्रमाण देखील कल्पनापलीकडे. त्यामुळे महिलांची सुरक्षितता घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे धोक्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिला कार्यकर्त्यांना चारित्र्यहनन आणि मानसिक अत्याचारांना वेळोवेळी सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधावर होतो आणि महिलांचे सामाजिक खच्चीकरन केले जाते. यासाठी देखील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि कोणत्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थावर फ़ौजदारी खटले दाखल झाले पाहिजेत. चरित्र्यहनानाची व्याख्या महिला आणि पुरुष यांना समान असवी.
राजकीय पक्षांची आणि राज्य व केंद्र्सरकारची भूमिका आणि कायदे महिला सुरक्षितेच्या दृष्टीने असणे अपेक्षित आहे. सध्याची राजकीय बलात्कारित पुढाऱ्यांना संरक्षण देण्याची राजकीय पक्षांची भूमिका निषेधार्ह आहे. यासाठी महिला अत्याचार विरोधी शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे.
महिलांना आर्थिक, मानसिक, बौद्धीक सक्षम होण्याची नितांत गरज आहे. महिलांमध्ये सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या असंख्य महिला नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. महिलांनी कौटुंबिक आणि सामाजिक आव्हाने पेलण्याची गरज आहे.
महिलांनी आरोग्य, आहार , व्यायाम , शिक्षण आणि करियर याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. आर्थिक सक्षमता हेच महिला सक्षमीकरणाचे खरे शश्त्र आहे. त्यामुळे स्वतःला आर्थिक सक्षम करण्यावर महिलांनी भर देण्यासाठी स्वतःला नियोजनपूर्वक शारीरिक आणि मानसिक सक्षम करणे आवश्यक आहे.
जाता जाता एकच सांगावेसे वाटते, ०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हा संघर्षातून चळवळीतून आणि आंदोलनातून आपले हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. याचा कधीही विसर न पडू देता हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी नव्हे तर आपल्या न्याय आणि हक्कासाठी संघर्ष करण्यासाठीचा दिवस आहे. याची जाणीव ठेवून समाजातील आपल्या असंख्य माता-भगिनींवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आठवण ठेवून आपण आपले कर्तव्य करूया. असे मी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील, विश्वातील माझ्या सर्व महिला सहकाऱ्यांना आवाहन करते. प्रजेचा विकास च्या प्रतिनिधीशी बोलताना डॉ. भारती चव्हाण यांनी मत मांडले.
Home ताज्या बातम्या महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात ही निश्चितच महिलांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब...