नागपूर,दि.13 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाअंतर्गत आत्मनिर्भर अभियानाचा भाग म्हणून ‘ऑपरेशन ग्रीन’ राबविले जात आहे. या योजने अंतर्गत संत्रे , पालेभाज्या यासारख्या कृषी मालाच्या अतिरिक्त उत्पादनाची वाहतूक बाजारपेठांमध्ये रेल्वेद्वारे वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान हे रेल्वे वाहतूकीसाठी दिले जाते. कृषी मालाचे संग्रहण आणि शीत साखळी साठी सुद्धा 50 टक्के अनुदान दिलं जातं . मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ‘संपदा ‘या पोर्टलवर ऑनलाईन स्वप्रमाणित कागदपत्रे जोडावे लागतात.
ही अडचण लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म , लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी 3 ऑक्टोबर रोजी नागपूर मध्य रेल्वे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या सोबत नागपूर विभागातून संत्र्याच्या वाहतुकीबाबत एक बैठक घेतली असता फळ आणि पाले-भाज्यांची रेल्वे मार्फत वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर वाहतुकीसाठीचे अनुदान हे वाहतूकीसाठी नोंदणी करण्याच्या वेळेसच देण्याचे सुचविले. गडकरींच्या या सुचनेची दखल रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने घेतली आणी कृषी मालाच्या रेल्वे वाहतुकीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचं स्वीकारल आहे.
या पावलामुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी अनुदानीत शुल्कात रेल्वे वाहतूकीसाठी नोंदणी करता येईल. या सुविधेमुळे अधिकाधिक शेतकरी या सुविधेचा लाभ घेतील तर रेल्वेला यामुळे चांगले तिकिट भाडे उपलब्ध होऊन त्यांचा नफा वाढेल, असे सांगून रेल्वे वाहतूकीच्या या सहकार्याच्या भूमिकेबद्दल गडकरी यांनी एका टिव्टद्वारे दोन्ही मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, नागपूरातून बांग्लादेशला रेल्वेद्वारे संत्रा वाहतूक करण्याचा निर्णयही यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वेने घेतला आहे. लवकरच संत्र्याची वाहतूक नागपूर रेल्वेद्वारे होणार आहे.