Home ताज्या बातम्या पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची उपस्थिती

0

पुणे,दि.31जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-

कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींकडून सूचना जाणून घेतल्या. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधीच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत  प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले.

राज्यात व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल.

व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतरही  केंद्राकडून करण्यात यावा, अशी  विनंती प्रधानमंत्री महोदयांना केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे  होवू नये यासाठी खाजगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,  राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होवू नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी  विकेंद्रीकरण करावे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा.  झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी  गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले.  त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भोर तालुक्यातील भूस्खलन होत असणाऱ्या गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करण्याच्या दृष्टिने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर  करावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी खाजगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे, कोरोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे. ससून रुग्णालयात तपासणी  क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरीतील शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा  मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांकडून आल्याचे सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या,  कोरोनाच्या रुग्णांना औषधे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत.  डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करुन द्यावी. सोसायट्यांनी  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे,अशा सूचना केल्या.

खासदार सर्वश्री  गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे यांच्यासह लोकप्रिनिधींनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली,  तसेच सूचना केल्या. पुण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध करुन द्यावा. खाजगी रुग्णालयांचे बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत ठेवावी, कोविड केअर सेंटर मधील भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा. प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. माहिती, शिक्षण आणि संवाद यावर भर द्यावा.  कोरोना तपासणीसाठी फिरते तपासणी केंद्र सुरु व्हावे, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक  आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना उपस्थित लोकप्रतिनिधींनी केल्या.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय  माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी माहिती दिली.

Previous articleपिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Next articleमिशन बिगिन अगेन’चा पुढचा टप्पा नियमावली जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × three =