पुणे,दि.24 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने इच्छित स्थळी वेळेवर राखी पोहोचावी यासाठी एक विशिष्ट प्रकारचा लिफाफा आणला आहे. विविध रंगांनी युक्त हे वैशिष्यपूर्ण लिफाफे, न फाटणारे, जलरोधक आणि स्वतःहून चिटकवता येणारे असे आहेत. 10 रुपये या वाजवी किंमतीत, हे विशेष लिफाफे 25 जुलै म्हणजेच उद्यापासून सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतील.
‘विशिष्ट वैशिष्ट्यांसह असलेले हे लिफाफे म्हणजे सध्याच्या कठीण प्रसंगातही प्रेम आणि उत्सवाची भावना कायम ठेवण्याचा आणि लोकांमधील प्रेम व बंधुभाव बळकट करण्याचा मुंबई टपाल विभागाचा अभिनव प्रयत्न आहे’, असे भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या. रक्षाबंधनाचे सर्व टपाल प्रथम श्रेणी टपाल म्हणून समजले जातील, ज्यामुळे ते सणाच्या आदल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी सामान्य टपालासाठी असणाऱ्या किंमतीत त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचतील, असेही पांडे यांनी नमूद केले. लिफाफ्यांच्या रंगीबेरंगी डिझाइनमुळे त्यांची ओळख सुलभ होण्यास आणि जलद पोहचण्यास मदत होईल. आंशिक लॉकडाऊन आणि आव्हानांच्या या कठीण काळातही इंडिया पोस्ट, रक्षाबंधनाशी संबंधित सर्व टपाल त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल याची खात्री करेल, असेही त्यांनी सांगितले.इतर टपाल विभागातही असेच खास लिफाफे करण्यात आले आहेत.