पिंपरी,दि.24 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोविड १९ हा विषाणू पिंपरी-चिंचवड शहरात हाहाकार माजवत आहे. दिवसाला ५५० हून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. काल दिवसभरात ९५० रुग्णांची विक्रमी नोंद झाली. याच गतीने रुग्णवाढीचा वेग कायम राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. रुग्णवाढ होत असताना पालिकेच्या रुग्णालयात ‘आयसीयू’, ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘क्वारंटाऊन सेंटर’ वाढवण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा रुग्णांचे हाल झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा मनसेचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला वाढत आहे. काल दिवसभरात ९५० रुग्णांची नोंद झाली. ही रुग्णवाढ थक्क करणारी असून भविष्यात रुग्णवाढीचा हाच वेग राहिला तर याच्या तुलनेत आपली वैद्यकीय उपचार पध्दती कार्यक्षम राहणार नाही. सध्या पालिकेच्या रुग्णालयात असलेली उपकरणे अपुरी भासत आहेत. खासगी रुग्णालये देखील रुग्णांनी भरलेली आहेत. अशात नव्याने वाढणा-या रग्णांना कोणत्या ठिकाणी उपचार देणार, हा प्रश्न उपस्थित आहे. नवीन सिम्टमॅटिक रुग्णांना उपचार देण्यासाठी सध्या पालिकेच्या रुग्णालयातील आयसीयू विभागात एकही बेड शिल्लक नाही. व्हेंटिलेटरची मोठी कमतरता भासत आहे. नव्याने नोंद होणा-या असिम्टमॅटिक रुग्णांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटरची कमतरता आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार देणे शक्य होणार नाही. असे झालेच तर मनसे शांत बसणार नाही, असेही चिखले यांनी आयुक्तांना सूचित केले आहे.मनसेचे मनविसे अध्यक्ष हेमंत डांगे, मनसे उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष दिपेन नाईक महाराष्ट्र नवर्निमाण सेना पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्ते या प्रश्नी आक्रमक असून या आयुक्तांकडून कोणतीही हयगय झाल्यास महापालिका आयुक्तांना पळता भुई थोडी करू, असा इशाराही चिखले यांनी दिला आहे.
उत्तम वैद्यकीय सुविधेसाठी मनसेच्या मागण्या मान्य कराव्यात…
पालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये कोरोना टेस्टची सुविधा मोफत उपलब्ध ठेवावी. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे शहरातील खासगी दवाखाने ताब्यात घ्यावेत. तेथील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केलेली बिले सरकारी नियमावलीनुसार देण्यात यावी. अशा रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा जबाबदार अधिकारी नियुक्त करावा. वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोना सेंटर/बेड्सची व्यवस्था करावी. पालिकेच्या शाळा किंवा मंगल कार्यालयात तातडीक वैद्यकीय सेवा कार्यान्वीत करावी. पालिकेच्या व खासगी अॅम्ब्युलन्स मोफत सुरू कराव्यात. कोरोना योध्दा म्हणून समाजसेवकांची, डॉक्टर्स आणि नर्सची मानधनावर नेमणूक करावी. ‘आयसीयू’ आणि ‘व्हेंटिलेटर’ची संख्या वाढवावी. शहरातील मोठ-मोठ्या उद्योगाच्या ठिकाणी कोरोना टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना द्याव्यात. उपलब्ध रुग्णालयातील बेड्स, टेस्टिंग सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.