आंबेगाव,दि22 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे फैलाव रोखण्यासाठी अनेक सोसायट्या खबरदारी घेत आहेत. तर पुण्यातील आंबेगाव परिसरात काही जणांकडून नियमांचे उल्लंघन करीत अरेरावीपणा केले जात असल्याचे दिसून आले आहे. सोसायटी मध्ये आत प्रवेश करताना मास्क का लावला नाही, अशी विचारणा करणाऱ्या चेअरमनला चार तरुणांनी बांबूने बेदम मारहाण केली. चेअरमनचा डोळा, पाठ आणि हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी तिघाजणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असुनही हि घटना दोन दिवसांपूर्वी आंबेगाव खुर्द परिसरातील साईसमर्थ नगरीमध्ये घडली.
कृष्णा बबन लोखंडे (वय 22), अजय भगवंत घाडगे (वय 21 दोघेही रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द ) आणि अनिल संभाजी नेटके (वय 21, रा. लिपाणेवस्ती, आंबेगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.अमित पाटील (वय 39, रा. आंबेगाव खुर्द ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हे साईसमर्थ नगरी सोसायटीचे चेअरमन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांनी सर्व सोसायटी रहिवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. दोन दिवसांपूर्वी चार वाजण्याच्या सुमारास कृष्णा, अजय आणि अनिल एका साथीदारासह साईसमर्थनगरी सोसायटीत मित्राला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. त्यामुळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये असताना अमितने चौघांना मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली असता त्याचा राग आल्यामुळे चौघांनी मिळून अमितला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पार्किंगमधील बांबू घेऊन त्यांच्या पाठीवर आणि हातावर मारुन जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असुन त्यांच्या एका साथीदाराचा शोधावर आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर अधिक तपास करीत आहेत.