मुंबई,दि.20जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- येत्या रविवारी, 21 जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातुन दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून उर्वरित भारतातुन हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणापृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. देहरादून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 टक्के भाग, मुंबईमध्ये 62 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.
मुंबईतून खंडग्रास दर्शन
21 जून रोजी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे 70 टक्के ग्रासित दिसेल. दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतु मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल अशी आशा खगोलप्रेमींना वाटत आहे.
खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाभारत युद्ध झाले त्या हरियाणामधील कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दिसणार आहे. यानंतर भारतातुन कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग 21 मे 2031 रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातुन दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशीरा म्हणजे 3 नोव्हेंबर 2404 रोजी येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.