नवी दिल्ली,दि.१ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला मराठीत ट्विट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. आगामी काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करत असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. याला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र,यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020
त्याऐवजी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण होईल. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालाचा जनतेला उद्देशून संदेश देतील. तर मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री हुतात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील.
यापूर्वी कोरोनामुळे राज्यातील अनेक उत्सव रद्द करण्यात आले होते. देशभरात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे ५८३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०, ४९८ इतका झाला आहे. यामध्ये मुंबईतील ७०६१ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत शहरातील २९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी येथील मृत्यूदर हा चिंतेचा विषय आहे.