नवी दिल्ली, 29 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-आयआरसीटीसी अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या 23 स्थायी उपाहारगृहातून(बेस किचन) कागदी डिशमध्ये शिजवलेले अन्न गरजूना पुरविण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. ही उपाहारगृहे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,अहमदाबाद, तर मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे, सोलापूर आणि भुसावळ या ठिकाणी तसेच देशातील 11 रेल्वे परिक्षेत्रातील 17 अन्य ठिकाणी आहेत. रविवार दिनांक 29 मार्च 2020 रोजी आयआरसीटीसीने गरजू, स्थलांतरित कामगार तसेच काही वृद्धाश्रम आणि देशातील अन्य ठिकाणी 11 हजार पेक्षा जास्त भोजन पॅकेट्सचे वितरण केले. वितरण कार्यात रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचारी आणि अन्य रेल्वे अधिकाऱ्यांनी मदत केली. या अन्न वितरण कामात यापुढे स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जाऊ शकते.