पुणे,दि.२२मार्च२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षणाचे माहेर घर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेलं पुणे सध्या शांत ओस झाले आहे, कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं पुणेकरांनी पुढाकार घेत सकाळपासूनच बाहेर पडणं टाळले. पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कायम वर्दळ असणाऱ्या पुण्यात आज संपुर्ण शांतता पसरली आहे.
नेहमी गजबजलेली महात्मा फुले मंडई आज मात्र चिडीचूप आहे. यावरून एकूण पुण्यातील परिस्थितीचा अंदाज येतो.पुणे कॅम्प, स्वारगेट, रविवार पेठ, डेक्कन, मंडई, दगडूशेठ गणपती, लक्ष्मी रोड, आणि तुळशी बाग येरवडा विश्रांतवाडी,काञज,मार्केट यार्ड या सारख्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणांवर आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
बहुतांश दुकाने, हॉटेल्स, वाहतुक व्यवस्था, सर्व प्रकारचे व्यवहार बंद होती. तरीही नागरीकांनी गर्दी करून एकत्र थांबू नये, बंद असतानाही कोणी हॉटेल्स, दुकाने किंवा अन्य कार्यालये सुरू आहेत, का त्याची पाहणी करून ते थांबविण्यासाठी पुणे पोलिस सकाळी सात वाजल्यापासूनच गस्तीवर होते.शहरामधील रस्ते, चौक शांत असतानाही बहुतांश ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांमध्ये थांबलेले चित्र दिसत होते. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिस ठाण्यांच्या बीट मार्शलबरोबरच अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारीही आपापल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. वस्त्यांमध्ये काही प्रमाणात नागरीक एकत्र येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते.