अकोला,दि. 19 फेब्रुवारी 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-शिवजयंतीचं औचित्य साधून अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शनं आयोजित करण्यात आलं आहे. महाराजांच्या शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी हे तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.अकोल्यातल्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जळगावच्या अमळनेरमधले पंकज दुसाने यांनी गेल्या वीस वर्षांत दुर्मीळ अशी ३०० हून अधिक शिवकालीन शस्त्रांचा संग्रह केला आहे.म्हैस, गेंड्याची पाठ अन कासवाच्या पाठीपासून तयार केलेली ढालही या प्रदर्शनात पाहायला मिळते. याशिवाय चिलखत, तोफ गोळा आणि वाघनखंही इथे आहेत. याखेरीज इतरही अनेक प्रकारची शस्त्रं आणि हत्यारं इथे मांडण्यात आली आहेत. प्रत्येक शस्त्राची माहिती, ते कशापासून बनवलं, ते केव्हा आणि कोणत्या लढाईत वापरलं, याची इत्यंभूत माहिती इथे मिळत आहे. अकोला सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.आम्ही फक्त पुस्तकात महाराजांबद्दल एकलं होतं. आज प्रत्यक्षात त्यांची शस्त्र पाहायला मिळाल्याचा खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वार्थानं समजून घेण्यासाठी अशी प्रदर्शनं आयोजित करणं गरजेचं आहे. यातून नवी कर्तृत्ववान पिढी तयार व्हायला मदत होणार आहे.