तळेगाव, दि. १२ आॅक्टोबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी:- अवघ्या पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके हेच मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. शेळके यांना मित्रपक्षांची साथ तर आहेच, पण त्यांच्या पूर्वीच्या पक्षातील समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेते, मनसेचा जाहीर पाठिंबा यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. त्यांच्या पदयात्रांना, प्रचारसभेला, कोपरा सभांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादावरून आमदारपदी सुनिल शेळकेंनाच मतदारांची पसंती आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सुनिल शेळके यांनी नगरसेवक असतानाही मावळ तालुक्यात मोठी विकासकामे केली आहेत. मूळचा समाजकारणाचा पिंड असल्यामुळे त्यांनी समाजाच्या विकासालाच नेहमी प्राधान्य दिले. तळागाळातील कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळेच नागरिकांचा त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. विकासकामांसाठी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करणारे शेळके एकमेवच असावेत. मावळ तालुक्यातील १५० पैकी ११८ गावांमध्ये शेळके यांनी स्वनिधी वापरून आणि लोकांच्या सहभागाने विविध विकासकामे केली आहेत. आरवाडे गावासाठी विकासाची गंगा आणली. ८२ लाखांचा फंड आणून विविध प्रलंबित कामे केली. समाज मंदिर, थ्री फेज लाइन, स्मशानभूमी बक्षीसपत्र करून सहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. सुनिल अण्णांनी केलेल्या विकासकामांची यादी मोठी आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांची कामे केली आहेत ,
पावणे दोन कोटी रुपयांचा निधी रस्ते, दलित सुधार योजना, सभा मंडप यासाठी आणला आहे, विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, परीक्षा काळात मावळच्या दुर्गम भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत मोफत व्यवस्था, कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी, महिलांना मोफत शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापना, तळेगाव स्टेशन चौकात स्वखर्चाने रस्ता दुभाजकाची उभारणी, १५ वर्षांपासून प्रलंबित पाणीप्रश्नाची १० महिन्यात सोडवणूक अशा प्रमुख कार्यामुळे सुनील शेळके यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे यंदा मावळचा कारभारी बदलायलाच हवा, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. सुनील शेळके यांनी पक्ष बदलला असला तरी समाजसेवेची तळमळ, मावळ तालुक्याच्या विकासाचा ध्यास तोच आहे. त्यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेत काहीही फरक पडला नाही. म्हणूनच शेळके यांनी सुरु केलेल्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.