पुणे,दि.३ आक्टोबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- लोकसभा, विधानसभा आणि महानगर पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (A) शहरातील कॅन्टोमेंट मतदारसंघाची जागा मिळावी, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, भाजपने ‘आरपीआय’ला ठेंगा देत दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे ‘आरपीआय’ खूपच दुखावले असून, आता भाजपचा प्रचार करायचाच नाही, अशा मानसिकतेत कार्यकर्ते व स्थानिक नेते आहेत.
‘आरपीआय’च्या ६२ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर आयोजित बैठकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाला शहरात एकही जागा न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी दिसून आली. शहरातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी यासाठी शहरातील कार्यकर्त्यांनी आणि पक्षाने खूप प्रयत्न केले. मात्र भाजपने मित्रपक्ष असलेल्या ‘आरपीआय’ला गृहीत धरून एकही जागा सोडली नाही. लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे भाजपला सत्ता मिळवून देण्यात रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. असे असतानाही भाजपाने रिपब्लिकन पक्षाला न्याय न देता वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे तळागळातील कार्यकर्त्यांपासून ते शहरातील नेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात भाजपाविषयी चीड निर्माण झाली असून, प्रचंड असंतोष व नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळेच आज भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करतेवेळी आरपीआयचा कुठलाही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता त्यांच्यासोबत उपस्थित नव्हता. पुणे शहरातील आठही मतदारसंघांत भाजपला प्रचारामध्ये कुठलेही सहकार्य करायचे नाही, अशा प्रकारची भूमिका बैठकीत एकमताने घेण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अशोक शिरोळे होते. यावेळी बाळासाहेब जानराव, डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण, ऍड. मंदार जोशी, ऍड. आयुब शेख, निलेश आल्हाट, शशिकला वाघमारे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, प्रियदर्शनी निकाळजे, उज्वला सर्वभांड, वसीम पैलवान, मोहन जगताप, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, लियाकत शेख, चिंतामण जगताप, बाळासाहेब जगताप, किरण भालेराव, संतोष खरात, संदीप हंडोरे, केजी पवळे, आशिष भोसले, अविनाश कदम, गौतम वानखेडे, बाळासाहेब शेलार, फिरोज खान, मंगल राजगे, विनोद टोपे, शांतिनाथ चव्हाण, जितेश दामोदरे, प्रमोद कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.