कोल्हापूर,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) महापुराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य करुया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या गणराया ॲवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या भीषण महापूराच्या काळात शासन, प्रशासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी तसेच विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्थासोबत विविध गणेश मंडळानी पूरग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्यात फार मोठे योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करुन पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, महापूराच्या काळात सर्वांच्या सक्रीय योगदानामुळे जीवितहानी टाळता आली, तसेच सर्वच पूरग्रस्तांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे शक्य झाले, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यापुढे पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी शासन कटिबद्ध आहेच, मात्र शासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेच आहे. याकामी गणेशोत्सव मंडळानीही सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुया….
महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि अतिशय साधेपणाने साजरा करुया, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्तांना येत्या वर्षभरात सगळ्यांनी मिळून जेवढी मदत करता येईल, तेवढी करुया, पूरग्रस्तांना शासन आणि लोकसभागातून पुन्हा गतवैभव मिळवून देऊया, पूरग्रस्तांना रोजगार मिळवून देण्याकामी गणेश मंडळानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच गणेश मंडळासाठी गणराया ॲवॉर्डचे वितरण करावे, तसेच बक्षिसाच्या रक्कमेतही वाढ केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पूरग्रस्तांना शासनस्तरावरुन जी जी मदत करावी लागेल ती केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून पूरग्रस्तांसाठी सर्वती मदत करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. पूरग्रस्त शेतमजुरांना रोजगार देण्यासाठी गावातच विविध प्रकारची कामे निर्माण करुन त्यांना आगामी तीन महिन्यासाठी रोजगार हमीच्या कामानुसार मजुरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना श्रीमंत शाहु महाराज छत्रपती म्हणाले की, यंदाचा महापूर हा सव्वाशे वर्षातील सर्वात मोठा महापूर असून या महापूरात पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्यामध्ये शासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी विशेषत: गणेश व तालीम मंडळानी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासन आणि मंडळानी पूरग्रस्तांसाठी चांगलं बचाव व मदत कार्य केले आहे. संकटात जीव ओतून मदत करण्याची कोल्हापूरची परंपरा असून कोल्हापूरकरांचा हा आदर्श इतरांनाही प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांनी बचाव व मदत कार्यात घेतलेला पुढाकार महत्वाचा असून संकटकाळी धावून जाण्याचे काम जगात आदर्शवतच आहे. पूरग्रस्त भागासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करुन मदत कार्याने व पुनर्वसनाचे काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांनी विशेषत: गणेश व तालीम मंडळानी केलेल्या कामाचा आढावा घेऊन कौतुक केले. याप्रसंगी विविध गणेश मंडळाना गणराया ॲवॉर्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्यात योगदान दिलेल्या गणेश मंडळांचा गौरवही करण्यात आला.
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, एमआयडीसीचे संचालक राहुल चिक्कोडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी तसेच जिल्ह्यातील गणेश व तालीम मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.