पिंपरी,दि. १६ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महापालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर, फुगेवाडी येथे इयत्ता ८ वी ते १० वी ची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यासाठी ‘आयटीच’ या संस्थेला परवानगी देण्याबाबतच्या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी या विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सह आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर, फुगेवाडी येथील शाळेच्या नवीन इमारतीमध्ये आयटीच या संस्थेद्वारे उच्च प्राथमिक इयत्ता ८ वी ते १० वी ची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यासाठी महापालिकेला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शाळा चालविण्यासाठी आयटीच संस्थेने महापालिकेकडे आवश्यक वर्ग खोल्या, भौतिक सुविधा तसेच वीज व पाणी पुरवठा अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यास आज मान्यता देण्यात आली आहे. फुगेवाडी येथे नव्याने सुरु करण्यात येणारी इंग्रजी शाळा चालविण्याची पूर्ण जबाबदारी आयटीच संस्था घेणार आहे. त्यामध्ये शाळेचे रोजचे संचलन, मुख्याध्यापक व शिक्षक निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पध्दती, प्रगती मूल्यमापन, देणगीदार जोडणी, शासनाच्या आवश्यक विविध परवानग्या व मान्यता घेणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. आयटीच संचलित शाळेमध्ये एस.एस.सी. अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. तसेच शिक्षण विभागाने नमूद केल्याप्रमाणे सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या शाळेमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असून या वर्गाची प्रवेश क्षमता ३५ इतकी असणार आहे.
यासह सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील विविध व्हॉल्वसाठी लावलेले अॅक्च्यूएटर बदलनणे, जेएनयुआरएम – बीडब्लूएस अंतर्गत पुनर्वसन प्रकल्पातील मोकळ्या जागा विकसित करणे, वायसीएम रुग्णालयातील अस्थिरोग विभागासाठी उपकरणे खरेदी करणे, मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ८० टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसची रक्कम इसीएसद्वारे देणे आदी विषयांच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.