खोपोली,दि.२५ एप्रिल २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्यासाठी मतदारसंघात फक्त “मशाल” पेटणार, असा शब्द खोपोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पटेल आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मुस्लिम अल्पसंख्याक बैठकीस संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, माजी नगरसेवक कमाल पटेल, तुराब पटेल, रशीद शेख यांच्यासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, गेल्या दहा वर्षात आपल्या अपेक्षांचा भंग झाला आहे. मला आपण जे सुचवाल ते मी करेन अशी ग्वाही वाघेरे पाटलांनी या वेळी दिली. तसेच मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन. आपण मतभेद बाजूला सारून जास्तीत जास्त मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
मावळ लोकसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षांत एकही एतेहासिक विकास काम खासदारांनी केलेले नाही. अनेक कामे रखडलेले आहेत. त्यांनी कायम दुर्लक्ष केले असून आपण खासदार झाल्यानंतर अशी कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा भावना मुस्लिम अल्पसंख्याक नेते आणि कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, खोपोली शहरातील विविध भागात उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मुस्लिम समाजातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. या वेळी ठिकठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्वच परिसरात वाघेरे पाटील यांनाच एकजुटीने लोकसभेत पाठविण्याचा निर्धार करण्यात आला.
भांडवलदारांच्या बाजूने जाणारे हे सरकार ...
मावळ लोकसभा मतदारसंघातील खोपोली शहरातील पाण्याचा प्रश्न , औद्योगिक, वीज, रस्ते, प्रदूषण, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आज तागायात सोडविला गेला नाही. ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे होता तो झालेला नाही. तरुणांचा नोकऱ्यांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न आजही मार्गी लागला नाही. शिक्षणव्यवस्था सुधारलेली नाही. शिक्षण क्षेत्रात अव्वाच्या सव्वा फी वाढ झाली आहे. त्यावर या सरकारचे नियंत्रण नाही. हे सरकार भांडवल दरांच्या बाजूने चालणारे सरकार आहे. शेतकऱ्यांना पाहिजे, त्या गोष्टी मिळत नाहीत, असे प्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी दिले.