पिंपरी, दि.१४ मार्च २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- संतांच्या संगतीत जीवनाचं सोनं होतं, असे सांगत ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी गाथा पारायण आणि कीर्तन सोहळ्यामध्ये कीर्तन सेवा सादर केली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे हा सोहळा सुरू आहे.जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देगलूरकर महाराजांनी कीर्तन सेवेसाठी त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग निवडला .
देव वसे चित्तीं । तयांची घडावी संगती ॥१॥
देगलूरकर महाराजांनी सांगितले की, तुकोबाराय म्हणतात संत फक्त देवाकडे आणि साधूसंतांकडेच मागणी मागत असतात. संत फक्त परमार्थच मागत असतात आणि ते देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताकडेच असते. व्यवहारात सुद्धा जो देण्यास समर्थ असतो, अशा व्यक्तीकडेच आपण मागणी करत असतो. चुरमुऱ्याच्या दुकानात हिरा मागून चालत नाही आणि हिऱ्याच्या दुकानात चुरमुरे मागून चालत नाही. चुरमुरेवाल्याकडे हिरा मागितला तर तो देऊ शकणार नाही पण हिऱ्याच्या दुकानात चुरमुरे मागितले तर ते देऊ शकतात. तसेच देवाकडे हे तुम्ही परमार्थ मागितला तर तो देणार परंतु संसारातल्या गोष्टी मागितल्या तरी तो देऊ शकतो.
देवाला सुद्धा जेव्हा मागणीची इच्छा निर्माण झाली तेव्हा त्याला बळीकडे जाताना बटुत्व म्हणजे लहानपण घ्यावं लागले. तुकाराम महाराज देवाकडे मागतात. आपल्यामध्ये अपूर्णता असते म्हणून परमार्थात परिपूर्णता येण्यासाठी मागावे लागते. माणूस देवाला अगदी थोडे देतो आणि मागणे मात्र मोठे मागतो. देवाला काही मागायचे असेल तर आपल्याकडील वस्तू, क्रिया आणि आपली तत्त्व अत्यंत मनोभावे देवाला समर्पण करावी.देगलूरकर महाराज म्हणाले की, संत महात्मे संसारा करता, स्वार्था करता काही मागत नाही ते परमार्थ करण्यासाठी मागतात. जर साधकांना देव प्रसन्न झाला तर त्याने देवाकडे काय मागावं याचा वस्तू पाठ संतांच्या मागणीत असतो.
संत देवांच्या संबंधाने संताकडे आणि संतांच्या संबंधाने देवाकडे मागत असतात. नवविधा भक्ती देवाच्या संबंधाने मागणी आहे म्हणून संतांकडे मागतात. मला संतांच्या स्वाधीन कर अशी मागणी देवाकडे करतात. ज्याच्या चित्तात देव वसतो, ज्यांना सगुन निर्गुणाने देवाचा साक्षात्कार झाला आहे, त्याची संगती मिळावी ही संतांच्या संबंधातील मागणी तुकाराम महाराज देवाकडे करतात. परंतु देव तर सर्वांच्या चित्तात राहतो. पण काही ठिकाणी तो विशेषत्वाने राहतो. सर्वांच्या हृदयात सामान्य रूपाने देव असतो पण साधूंच्या हृदयात विशेष रूपाने राहतो.
त्यांनी सांगितले की, तुकाराम महाराज म्हणतात मला अखंड संत संगती हवी हरिभक्त ची भेट झाल्यावर पुन्हा त्याच्या अंगसंगाचा वियोग होऊ नये कारण संतांच्या संगतीत आयुष्य घालवणे हेच मला सर्वात चांगले वाटते.
संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर बुद्धीचा जडपणा जातो, वाणीला सत्यत्व प्राप्त होते, सन्मान वाढवला जातो, पाप कमी होते, मनाला प्रसन्नता प्राप्त होते आणि दहा दिशांना आपली कीर्ती होते म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला अखंड संत संगती दे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे वंशज हभप पुष्कर महाराज गोसावी (पैठण) कीर्तनकार हभप सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर (नांदेड), हभप स्वामी महाराज टेमगिरे उपस्थित होते.
वांजळे महाराज यांचीही कीर्तनसेवा-सोहळ्यात हरिभक्त परायण चंद्रकांत वांजळे महाराज यांनी सादर केली.
पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजरिया ॥१॥
या अभंगावर त्यांनी कीर्तन केले. तुकोबारायांनी भंडारा, भामचंद्र आणि घोरावडेश्वर या तीनही डोंगरांना पावन केले. हा सोहळा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी व्हावा ही तुकोबारायांचीच इच्छा असावी.वांजळे महाराज म्हणाले की, प्रभू तत्व पवित्रालाही पवित्र करते. पवित्र होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आपल्यातील अपवित्रपणाची दोषाची जाणीव व्हावी लागते, टोचणी लागावी लागते. साधकाने ज्ञानोबा तुकोबांना आदर्श मानून त्याप्रमाणे वागावे. संतांना देवाचे आणि देवाला संतांचे चरित्र आवडत असते. संत निळोबाराय म्हणतात भगवंताचे सगुण चरित्र हे परमपवित्र असते. जीवदशेपासून शिवदशेपर्यंत जाणे हे ज्या क्रियेने किंवा तत्वाने घडते त्याला चरित्र असे म्हणतात. ज्याचे चारित्र्य चांगले त्याचे चरित्र ऐकावे.
ते म्हणाले की, सती, संत आणि शूर देशाची, समाजाची मान उंचावत असतात. कपटी कायर आणि क्रूर देशाची मान खाली घालत असतात. काल्याच्या कीर्तनात सुद्धा देवाचे चरित्र असते त्यामुळे त्याला खूप महत्त्व असते. नामाला पण चरित्र असते. रामकृष्णांची चरित्र ऐकून कोटी कोटी पापे नष्ट होतात. शिवचरित्राने सुद्धा आपणास प्रेरणा मिळते.देवाच्या चरित्राबरोबरच त्याच्या गोजिऱ्या रूपाच्या दर्शनाने पण पवित्र होईन असे तुकोबाराय म्हणतात. खरंतर संतांच्या चरित्राने दर्शनाने सुद्धा आपण पवित्र होऊ शकतो.
तुकोबाराय म्हणतात हे भगवंता तुमचे चरित्र उच्चारण्यासाठी लागणारी बुद्धी, लागणारे पुण्य माझ्याकडे नाही म्हणून मी तुझ्या पायाला मिठी मारून डोळ्यांनी तुझे रूप पाहिल. पांडुरंगवर्णन पर ओव्या गाईन आणि धर्मनिष्ठ व भगवन्निष्ठ संतांच्या संगतीत राहून पांडुरंग स्वरूपाचा विचार करीत आयुष्य घालवीन. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मी आपल्या मनात तुझे नाम जतन करीन. कीर्तनावर जगू नका, कीर्तन जगवा. तेच कीर्तन तुम्हाला फक्त जगवणार नाही तर चिरंजीव करील, असे वांजळे महाराज यांनी सांगितले.