भोसरी,दि.१७ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली .असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस , निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव होताना दिसत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली असून गेल्या दहा वर्षातल्या दहशत, दडपशाहीला नागरिक चोख उत्तर देतील असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे, रविवारी (दि १७) पत्रकार परिषदेत बोलत होते. कासारवाडीतील कलासागर हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी आमदार विलास लांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उमेदवार अजित गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले भोसरी मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक फेक नेरेटिव्ह सेट केला जात आहे. शनिवारी रात्री मतदारसंघातील गव्हाणे वस्ती भागामध्ये दोन कोटी रुपये सापडले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती पसरवण्यात आली. असा काही प्रकार घडलेला नसताना जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवली जात असल्याची तक्रार आम्ही पोलिसांकडे केली आहे. दोन महिन्यापूर्वीच दिघी पोलीस ठाण्यामधील काही पोलीस कर्मचारी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी काम करत असून याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबद्दल आम्हाला जशी शक्यता होती तेच प्रकार सध्या घडताना दिसत आहे.आज त्याबद्दलची तक्रारही पोलीस आणि निवडणूक विभागाकडे केली आहे. संबंधित पोलीस खुलेआम भाजप आमदाराला सहकार्य करत आहे. हे प्रकार राजरोसपणे दिसत असतानाही त्यांच्या बाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्यामुळे हे लोकशाहीचे राज्य आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
भोसरीमध्ये शनिवारी रात्री जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवण्यात आली . आमची बदनामी करण्यात आली. विरोधी उमेदवाराकडून करण्यात येत असलेले हे प्रकार म्हणजे त्यांना पराभव समोर दिसत आहे . ही निवडणूक आता नागरिकांनी हातामध्ये घेतले आहे. दहशत, दडपशाही झुगारून नागरिक परिवर्तनाच्या मानसिकतेमध्ये आहे .राज्यभर देखील नागरिक परिवर्तनाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्र पेक्षा गुजरातच्या विकासाचा विचार भाजपचे नेते करताना दिसून येत आहे. तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही वस्तुस्थिती आहे असे देखील गव्हाणे यावेळी म्हणाले.
विलास लांडे म्हणाले, जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यातून कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. संभ्रम निर्माण केला जात आहे. खोटी माहिती मतदारसंघात पसरवली जात आहे याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त निवडणूक विभाग अशा सगळ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र कारवाई होताना दिसत नाही. शनिवारी रात्री भोसरीमध्ये जो प्रकार घडला ,जी बदनामी करण्यात आली. असा कोणता प्रकार घडला हे देखील पोलीस सांगत नव्हते. रात्री दोन वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. मात्र नक्की काय घडले? कुठे पैसे सापडले याबद्दल पोलिसांनाही नीट माहिती देता आली नाही. जाणीवपूर्वक हे प्रकार घडत असून पोलीस निवडणूक विभाग यांनी याची दखल घेतली पाहिजे असे लांडे यावेळी म्हणाले.
सुलभा उबाळे म्हणाल्या भोसरी मतदारसंघांमध्ये “उलटा चोर कोतवाल को दाटे” असा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लेखी स्वरुपाची अनेक पत्रे पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली. भाजप पदाधिकाऱ्यांसाठी पोलीस यंत्रणा राबवली जात आहे. “वरून आदेश आले आहेत” असे काही पोलिस अधिकारी खाजगीत आम्हाला सांगतात. साम-दाम-दंड-भेद असे सगळे प्रकार वापरून भोसरी विधानसभेमध्ये पैसे वाटपाचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. नागरिक पैसे वाटप झाले म्हणून सांगतात. पोलिसांकडे तक्रार केली की पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रचार स्लिप वाटत असताना अटक केली जाते. खोट्या गुन्ह्यांच्या नावाखाली त्यांना अडकवले जात आहे. अशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जायचे होते तर जशा महापालिकांच्या निवडणुका रखडवल्या त्याचप्रमाणे विधानसभेच्या सुद्धा निवडणुका जाहीर करायच्या नव्हत्या .केंद्रातूनच सत्ता चालवायची होती असा संताप सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मतदारसंघात काम करत असलो तरी शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही .कार्यकर्त्यांना त्रास झाला तर जशाला तसे उत्तर दिले जाईल. खोट्या आरोपाखाली कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. रात्रभर पोलीस यंत्रणा धिंगाणा घालत आहे. अशा प्रकारचे उद्योग पोलिसांनी बंद करावेत. निवडणूक विभागाने यामध्ये दखल घ्यावी. उचित कारवाई करावी अशी मागणी देखील सुलभा उबाळे यांनी यावेळी केली.
कैलास कदम म्हणाले, भाजपचा नारा, भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा होता. मात्र परिस्थिती तशी नाही. नागरिकांमध्ये भय निर्माण केले जात आहे आणि खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिला आहे. हे राज्य लोकशाहीचे की हुकूमशाहीचे असा प्रश्न मात्र आता पडू लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली. नक्कीच त्या राज्यघटनेप्रमाणे येथील कारभार होत नाही असे दिसून येत आहे. पोलीस देखील चुकीच्या पद्धतीने वागत असून चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडला जात आहे. कार्यकर्ते ,पत्रकार अशा सगळ्यांना धमक्या दिल्या जात आहेत . विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने फेक नेरेटिव्ह सेट केले जात आहे . आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो ही नक्कीच हुकूमशाही आहे.
साहेबांची सभा होऊ नये म्हणून विरोधी उमेदवाराने आकाश पातळ एक केले…!
अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. मात्र ही सभा होऊ नये यासाठी विरोधी भाजप उमेदवाराने आकाश पातळ एक केले. अपक्ष उमेदवाराला या मैदानावर सभा घ्यायची आहे म्हणून अर्ज देण्यात आला. या अर्जावर खोटी सही होती. अनेक दिवस सभेच्या मंजुरीबाबत खेळवण्यात आले. हा प्रकार साहेबांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले. ” मी भोसरी विधानसभेत येतोय तुमची काही अडचण आहे का?” अशी विचारणा जेव्हा साहेबांनी केली तेव्हा हे मैदान आमच्यासाठी मंजूर करण्यात आले. यातून एकच सिद्ध होते विरोधी उमेदवारांना त्यांचा पराभव आता दिसू लागला आहे.
बटेंगे कटिंग असे म्हणत या ठिकाणी निवडणुकीला धार्मिक रंग दिला जात आहे.मात्र आम्ही सुद्धा हिंदू आहोत. आम्हाला आमच्या जातीचा, धर्माचा अभिमान आहे. तसाच आम्हाला इतर धर्माचा देखील तेवढाच अभिमान आहे. कोणताही धर्म, जात हे शिकवत नाही की दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करा. भारत मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. सर्वांना गुण्यागोविंदाने येथे राहणे अपेक्षित आहे. तरच आपला देश विकसित राष्ट्र होऊ शकतो.
अजित गव्हाणे
उमेदवार महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ
Post Views: 15,034