मावळ,दि. ०७ नोव्हेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):-महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना विरोधातील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खरंतर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा देण्या बाबत आम्ही सकारात्मक होता. मात्र ज्यांना आम्ही मित्र समजतो, त्यांना आमचा पाठिंबा नको होता. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळत आम्ही आरपीआय आठवले पक्षाचा संपूर्ण पाठिंबा महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर केला असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट सांगितले आहे. मावळात आम्ही मागील 15 वर्षाचा मित्र असलेल्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत राहण्याची भूमिका स्वीकारली होती मात्र त्यांनी आम्हाला डावलले, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांना भेटा असे सांगितले मात्र त्यांनी आठवले साहेब यांना भेटणे टाळले. ते बारामतीत शरदचंद्र पवार साहेब यांच्या घरी गेले, मुंबईत राजसाहेब ठाकरे यांच्या घरी गेले मात्र आमच्या रामदासजी आठवले साहेब यांच्या घरी गेले नाही, वारंवार आम्ही सांगून देखील ते आम्हाला बाजूला ठेवत होते. माझ्या राजकीय कारकिर्दीला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मावळात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना पाठिंबा देण्याचा जाहीर केले आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी काळात या तालुक्यातील व राज्यातील आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रश्न मार्गी लावायचे असतील तर महायुती शिवाय पर्याय नसल्याने व रामदास आठवले साहेब यांचा आदेश असल्याने आम्ही पूर्ण ताकतीने महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करणार आहे. त्यांना निवडून आणणे ही आमची जबाबदारी असल्याचे सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहराध्यक्ष कमलाशिल म्हस्के, पुणे जिल्ह्याचे नेते गणेश गायकवाड, महिला उपाध्यक्ष यमुना साळवे, मालन बनसोडे, अंकुश सोनवणे, विजय देसाई यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले, आता परतीचे दोर कापले असल्याने ज्यांना पाठिंबा दिला त्यांचेच काम करायचे धोरण ठरले आहे. आम्ही कालपर्यंत भाजपाच्या तालुक्यातील ज्येष्ठांच्या संपर्कात होते, अपक्ष उमेदवार यांच्याशी देखील बोललो मात्र त्यांचे राजकीय सल्लागार योग्य नसल्याने त्यांची वाटचाल चुकू लागली असल्याचा टोला देखील वाघमारे यांनी लगावला आहे.