पिंपरी,दि.२० सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-प्रतिक गायकवाड):- मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी कामात झालेले महानगरपालिकेचे दुर्लक्ष व भ्रष्टाचार यास महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जबाबदार आहेत असा आरोप करून शहरातील सर्व शंभू प्रेमी संघटना संभाजी ब्रिगेड,काँग्रेस,शिवसेना उध्दव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व विविध सामाजिक संघटना वतीने महानगरपालिका गेटवर भिक मांगो आंदोलन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी केले होते.आंदोलनात जमा झालेली रक्कम पोलीस व सुरक्षा रक्षक यांच्या विरोधामुळे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना देता आली नव्हती. ती जमा झालेली सातशे एक्कावन रूपये रक्कम नुकतीच आंदोलकांच्या वतीने पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना मनीऑर्डर करून पाठवली आहे.
छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे ही शहरातील नागरिकांची इच्छा आहे. या कामात भ्रष्टाचार होऊ नये काम दर्जेदार व्हावे ही शंभू प्रेमींनी भावना आहे. सुरवातीला या स्मारकासाठी एक जागा निश्चित करण्यात आली होती. तब्बल पाच कोटी पन्नास लाख रूपये खर्च केल्यानंतर ही जागा बदलण्यात आली. यानंतर या स्मारकासाठी मोशी येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची अडीच एकर जागा निश्चित करण्यात आली.पहिले काम व नविन काम हे धनेश्वर कंस्ट्रक्शन या एकाच ठेकेदारास देण्यात आले.पुतळा बनविण्याचा कोणताच अनुभव नसताना हे काम सुद्धा पालिकेने याच ठेकेदारास दिले. सदर पुतळ्याचे काम या ठेकेदाराने दिल्ली येथील सुतार या शिल्पकारास दिले.या शिल्पकाराने पुतळ्याचे मोजडीसह लहान लहान पार्ट पाठवले होते.या मोजडीच्या भागास तडे गेल्याचे गेल्याच महिन्यात उघडकीस आले. तसेच सदर पार्ट अस्वच्छ जागेत ठेवण्यात आले होते. हे सर्व उघडकीस आल्यानंतर शहरातील शंभू प्रेमी नागरिक संतप्त झाले. पत्रकारांनी आयुक्त शेखर सिंह यांना या विषयी विचारले असता सदर पार्ट शहरात आले नसल्याचे चुकीचे विधान आयुक्त यांनी केले होते. त्यामुळे सदर कामात भ्रष्टाचार व दुर्लक्ष झाले असल्याची पक्की समजूत नागरिकांची झाली. महानगरपालिकेने छत्रपती संभाजी महाराज स्मारकात भ्रष्टाचार करू नये हवे असल्यास आम्ही पैसे गोळा करून देतो. या भावनेने शंभू प्रेमी नागरिक तसेच सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने हजारोंच्या संख्येने आंदोलक एकत्र आले होते डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक ते राजमाता अहिल्यादेवी पुतळा परिसर मार्गे आंदोलक आंदोलन करत महानगरपालिकेच्या गेटवर फेरी काढून भिक मांगो आंदोलन करत आले होते. जमा झालेली रक्कम आंदोलकांच्या वतीने नुकतीच आयुक्तांना मनीऑर्डर करून पाठवण्यात आली.अशी माहिती सतिश काळे यांनी दिली.