चिंचवड,दि.२६ जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जगदगुरू संत श्रेष्ट तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखी सोहळ्या निमित्त देशभरातून व राज्यातून असंख्य भाविक भक्त श्री क्षेत्र देहू व आळंदी मध्ये दाखल होत असतात. या सोहळ्या दरम्यान वारकरी भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालखी सोहळ्यापूर्वी श्री क्षेत्र देहू ते आळंदी दरम्यान इंद्रायणी नदीची स्वच्छता त्वरित करण्यात यावी अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे .
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे म्हणाले कि, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ… म्हणत महाराष्ट्रातील लाखो भक्त माऊली पांडूरंगाच्या भेटीसाठी धाव घेतात. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने आषाढी वारी ३३९ व्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २८ जून, शुक्रवारपासून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव देहू आणि आळंदीमध्ये दाखल होत असतात याच इंद्रायणी नदीमध्ये ते स्नान करतात. याच नदीचे पाणी तीर्थ म्हणून पितात. जशी गंगा नदी तशीच इंद्रायणी अशी त्यांची आस्था असते. काही दिवसांवरती तुकाराम महाराज व ज्ञानोबा माउलीचा पालखी सोहळा येऊन ठेपलाय आणि त्याच्या आधीच या इंद्रायणी नदीची अशी अवस्था दयनीय झाली आहे.इंद्रायणी नदीपात्रामध्ये कारखान्यांमधून तसेच जलनिस्सारण नलीकामधून निघणारे दुषित पाणी मिश्रित होत असल्यामुळे वारकरी बांधवांनी तीव्र नाराज व्यक्त केली जात आहे. जर पालखी सोहळ्याच्या आधीच या प्रदूषित नदीची स्थिती सुधारले नाही तर वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पालखी सोहळ्यामध्ये वारकरी दाखल होण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी नदीपात्रातील जलपर्णी काढणे तसेच नदी पात्र स्वच्छ ठेवणेकामी ठेकेदारी पद्धतीने काम करण्यात येते. अश्या कामामधून अथवा पर्यावरण विभागाशी निगडीत कोणत्याही कामातून इंद्रायणी नदीपात्र श्री क्षेत्र देहू ते आळंदी दरम्यान स्वच्छ केल्यास होणारा पालखी सोहळा सर्व वारकरी बांधव या पवित्र भूमी मध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करू शकतील. वारकरी बांधवाच्या इंद्रायणी नदीशी असलेल्या भावनेचा विचार करून इंद्रायणी नदीपात्र त्वरित स्वच्छ करण्याचे निर्देश संबधित विभागास द्यावेत अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी निवेदनामध्ये केली आहे.