पिंपरी,१२ मार्च २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- संयमी व संवेदनशील राजकारणी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला परिचित असलेले माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना खासदार करण्याचा एकमुखी नारा पिंपरीगावातील ग्रामस्थांनी दिला. त्यांच्या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी सर्व मिळून खेचून आणू, असा निर्धार यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी केला.
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचा संदेश पिंपरीगाव येथील ग्रामस्थांना दिला आहे. पिंपरी येथील गणेश हॉटेल येथे नुकतीच पिंपरीगावातील सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, हितचिंतक यांनी स्वयं स्फूर्तीने समन्वय बैठक घेतली. या बैठकीला पिंपरीगावचे माजी नगरसेवक, विविध पक्ष-संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, सिंधी समाजातील प्रमुख पदाधिकारी, व्यापारी बांधव, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील यांनी कायम पिंपरीगावच्या, तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे. अनेक वर्षांच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना यापूर्वी मोठी संधी मिळणे गरजेचे होते. परंतु, आता मावळ लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ही संधी संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी व पिंपरीगावसाठी आलेली आहे. त्यांच्या निमित्ताने आपल्या हक्काचा माणूस खासदार होणार आहे. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी एकप्रकारे पिंपरीगावाला मिळणार आहे. ते आजवर प्रत्येकांच्या अडीअडचणीत निस्वार्थ वृत्तीने आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. या निवडणुकीत सर्व मिळून त्यांच्या पाठिशी उभा राहू आणि हा मावळ लोकसभेवर विजयाची पताका फडकवू, असे मत उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी व ग्रामस्थांनी मांडले.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संघटकपदाची जबाबदारी मिळाली. तेव्हापासून पिंपरीगावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते ठामपणे भक्कम पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांनी बैठकीतून माझ्यावर विश्वास टाकला आहे. माझ्या ग्रामस्थांनी, हितचिंतकांनी टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत- संजोग वाघेरे पाटील,मावळ लोकसभा संघटक, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)