मुंबई, दि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला.
एमटीएचएल अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला गेला आहे आणि सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.
“आमच्या नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल.”
प्रधानमंत्र्यांच्या समवेत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू
शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी बळकट करून नागरिकांची ‘प्रवास सुलभता’ सुधारणे हे प्रधानमंत्र्यांचे ध्येय आहे. या संकल्पनेनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल), आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ नामकरण झालेला पूल बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.