पिंपरी,दि. ३१ डिसेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जनतेप्रती समर्पणाचा भाव असलेल्या स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांनी नेहमी मूल्याधिष्ठीत राजकारण केले; त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकायला मिळते आणि प्रेरणाही मिळते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व.दिगंबर भेगडे यांना आदरांजली अर्पण केली.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे कै.दिगंबर(दादा) बाळोबा भेगडे प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र भेगडे आदी उपस्थित होते.
श्री.फडणवीस म्हणाले, स्व. दिगंबर(दादा) भेगडे यांच्यासोबत दहा वर्षे काम करता आले. ते समर्पित जीवन जगलेले कार्यकर्ते होते. पूर्णवेळ विधानसभेत बसून सगळ्या कामकाजात सहभागी होणारे दादा आपले विषय स्पष्टपणे आणि नेटाने मांडत असत. त्यामुळे मंत्री त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायचे. पंढरीचा वारकरी असणारे दादा विधानसभेत गेल्यावरही मानकरी न होता वारकरीच राहिले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या रुपात वारकरीच पहायला मिळाला, अशा शब्दात त्यांनी स्व.भेगडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
दादा आमदार नसतानाही सामान्य माणसाच्या मुलभूत प्रश्नांचा पाठपुरावा करत राहिले. त्यांनी हाती घेतलेली आणि अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नरत राहू. यातीलच भंडारा डोंगरावरचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करु, याबाबतच प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे देऊन या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. तुकाराम महाराजांच्या स्मृती महत्वाच्या असून त्या जपण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले स्व. भेगडे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मार्गाने पुढे जावे लागेल. राजकारण आणि समाजकारण त्यांच्या कुटुंबातच होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ अशा संस्थेवर त्यांनी विविध पदे भूषवली. या भागातील त्यांच्या कल्पनेतील प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. दानवे म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षण श्री. पाटील म्हणाले, अतिशय नम्र, अहंकारी वृत्तीला बाजूला सारत अधिकाऱ्यांना प्रेमाची वागणूक देणारा खरा कार्यकर्ता म्हणून दादांना ओळखले जाते. लोकप्रतिनिधींना त्यांचे जीवन आणि कार्य मार्गदर्शक आहे. स्व. आमदार भेगडे यांच्या निधनानंतर मावळ तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पनेतील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच स्व. दिगंबर दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्री. पाटील म्हणाले.यावेळी माजी राज्यमंत्री श्री. भेगडे यांनी आपले विचार व्यक्त केले.