पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२३( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करणे हे महापालिकेचे उद्दिष्ट्य आहे. पादचारी मार्ग, सायकलस्वारांसाठी सायकल मार्ग, सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील असा महापालिकेचा प्रयत्न आहे. अर्बन स्केपिंग डिझाईननुसार महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी तसेच लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात आले असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय रस्त्यांची सध्याची परिस्थिती बघता प्रोजेक्ट दिशा प्रस्तावित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे रहदारी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका करीत असलेल्या विविध रस्त्यांची अर्बन स्ट्रीट स्केप डिझाईन विषयासंदर्भात माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, उप आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, संध्या वाघ, प्रेरणा सिनकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वास्तुविशारद प्रसन्न देसाई, प्रांजली देशपांडे, प्रताप भोसले, विकास ठाकर तसेच विविध प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील जुन्या झालेल्या वाहतुकीच्या दळण-वळणामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. महापालिका शहरातील रहदारी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित आहे पण या उपाययोजना राबवित असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळणेही तितकेच गरजेचे आहे. हरित सेतू हा महापालिकेचा एक अनोखा प्रकल्प आहे ज्याचा जागतिक पातळीवर नामोल्लेख झाला आणि ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरस्काराने महापालिकेला सन्मानित करण्यात आले. जगभरातील ६६ देशांमधून आलेल्या २७५ अर्जांची काटेकोरपणे तपासणी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या मोहीमेनंतर नागरिकांना फुटपाथचा वापर करणे अधिक सोयीस्कर होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा शेखऱ सिंह यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, रस्ते हे कोणत्याही शहराच्या प्रगतीचे मानस असतात. सुसज्ज रस्त्यांवरून शहराच्या विकासाची ओळख होत असते. रस्त्यांची रचना, रुंदी, पदचारी मार्ग तसेच सायकल मार्ग या गोष्टींचा विचार करून रस्त्यांची निर्मिती केली जाते. नागरिकांच्या सोयीमध्ये रस्ता हा मोठा प्रभाव टाकणारा घटक असतो. रस्त्यावरील सायकल मार्ग किंवा फुटपाथचा वापर होत नसेल आणि त्यावर अतिक्रमण होत असेल तर नागरिकांमध्ये याबाबत जागृती करणे गरजेचे आहे, असे सांगून यासाठी महापालिकेस माध्यमांनीही सहकार्य केले पाहिजे जेणेकरून रहदारी कमी होण्यास मदत मिळेल आणि नागरिक जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी पादचारी मार्ग किंवा सायकल मार्गाचा वापर करतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.500
यावेळी वास्तुविशारद प्रसन्न देसाई यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अर्बन स्ट्रीटस्केप प्रकल्पाची माहिती दिली तसेच विविध शहरातील रस्त्यांची अवस्था, झाडांचे महत्व, पार्किंगचे विविध प्रकार आणि व्यवस्था, सुशोभिकरण आणि सुरक्षितता, रस्त्यांवरील विविध महत्वाचे घटक अशा विविध मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले तर सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.