पिंपरी, २८ ऑगस्ट २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गर्भापासून मृत्यूपर्यंत महिलांचा संघर्ष सुरूच असतो. म्हणून एक पाऊल पुढे नेत आपला विचारांचा लढा आपण द्यायचा आहे. माझ्या गर्भात मुलगा असो की मुलगी त्याला जन्म देण्याचा अधिकार मातृत्वाने मला दिला आहे. हे सासरच्या मंडळींना आपण ठणकावून सांगायचे आहे. अशा भावना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मांडल्या. जन्माला येणाऱ्या लेकीचे प्रत्येकाने स्वागत करून नवचैतन्याचा विचार मांडा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
मोशी येथील लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्रा. सौ. कविता आल्हाट यांच्यावतीने इंद्रायणी सखी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाकणकर बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी महापौर मोहिनी लांडे, राजमाता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली गव्हाणे, माजी नगरसेविका संगीता ताम्हणे , संजय उदावंत, युवा नेते अक्षय बारणे ,शहर कार्याध्यक्ष कविता खराडे, स्वयंरोजगार प्रदेश अध्यक्षा मेघा पवार ,संगीता आहेर ,पुष्पा शेळके, शीला भोंडवे ,पूनम वाघ , ऐश्वर्या पवार आदी उपस्थित होते.
महिला भगिनींच्या जीवनात कितीही त्रास असला, वेदना असल्या तरीही जिथे आम्हाला आमचा परफॉर्मन्स द्यायचा आहे,तिथे तो आम्ही चांगलाच देणार ही शक्ती महिलांमध्ये आहे. स्त्रीमध्ये मातृत्व आहे, दातृत्व आहे. नवीन सृष्टी निर्माण करण्याची ताकद याच मातृत्वात असते. कोणत्याही नवनिर्मितीचा विचार हा याच मातृत्व शक्तीच्या गर्भातून प्रेरणा घेत असतो. नऊ महिने नऊ दिवस एका गर्भाला सांभाळणे आणि त्याला जन्म देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बाळंत कळा काय असतात हे एक स्त्रीच समजू शकते .यातील एक कळ पुरुष सहन देखील करू शकणार नाही. त्यामुळे मातृत्व ही फार मोठी शक्ती आहे.
काही कारणास्तव आपण ऐकत राहतो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का शेतकरी महिलेने आत्महत्या केली. महिला असे टोकाचे पाऊल कधीच उचलणार नाही. ती निर्धाराने, खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीत उभी राहते. पदर खोचते आणि कामाला लागते. आपल्या सोबत आपल्या मुलाबाळांनाही मोठे करते. ही ताकद मातृत्व शक्तीमध्ये आहे .या शक्तीचा सन्मान करणे आपली जबाबदारी आहे असे चाकणकर यावेळी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या आम्हा तमाम महिलांसाठी एक आदर्श आहे. मंगळागौर हे एक निमित्त आहे. महिला भगिनींना एकत्र करणे त्यांना क्षणभराचा विरंगुळा देऊन त्यांच्या विचारांची आदान प्रदान व्हावी. त्यांना एक व्यासपीठ मिळावे असा हेतू यामागे आहे.(प्रा. सौ. कविता आल्हाटरा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष)