चिंचवड,दि.०६ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कसबा आणि चिंचवड पुणे जिल्हयातील विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूका होऊ घातल्या आहेत. या दोन्ही निवडणूका बिनविरोध करण्यात याव्या याकरिता हालचाली सुरु आहेत. पत्र, टेलिफोन द्वारे आवाहन करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम होवून या निवडणूका जर बिनविरोध झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. बिनविरोध न होता निवडणूक होणार असेल तर मक्तेदारी मोडून काढण्यासाठी जातीयवादाला मुठमाती देण्यासाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टी चिंचवड मतदार संघात निवडणूक लढणार आहे.
पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधीर लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी घोषित करण्यात येत आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा इत्यादींची बुज राखण्यासाठी निवडणूका बिनविरोध झाल्यास सुधीर ल. जगताप देखील आपली उमेदवारी मागे घेतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एक दिवस शिल्लक असल्यामुळे अत्यंत तातडीने घाई गर्दीत हा निर्णय घेण्यात आला. दलित वंचित मागासवर्गीय समुहांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुधीर ल. जगतापांची उमेदवारी आहे.
पुणे जिल्हयातील वतनी जमिनदारांचे प्रश्न, वतनी जमिनीचे प्रचंड प्रमाणात झालेले हस्तांतर, गोरगरीब अशिक्षित वतनी जमीनदारांच्या गरिबी व अज्ञानाचा गैरफायदा घेवून दाखविली गेलेली खरेदी व गहाणवट द्वारे शेकडो एकर जमिनीचे हया जमिनी जातीयवादी सत्ताधारी श्रीमंत शेतकऱ्यांनी हडप केलेल्या आहेत व त्याला जिल्हयातील राजकारणाची साथ आहे. या सर्व प्रकरणात महसूल
खात्यातील भ्रष्ट व जातीयवादींची बेमालूम साथ आहे. उताऱ्यांवर विविध नोंदी करणे, बोगस वारसदारांचे नाव नोंदवणे, क्षेत्रफळांचा मेळ जमत नाही असे शेरे मारुन वतनदार जमिनदाराची गळचेपी केली जात आहे. त्याचप्रमाणे आदिवासी जमातीच्या जमिनीची खरेदी विक्रीस बंदी असलेला कायदा अंमलात आणावा, या धर्तीवर महार वतन जमिनीच्या खरेदी विक्रीस पायबंद घालणारा कायदा अंमलात आणावा व अशा प्रकारे हस्तांतरीत झालेल्या वतन जमिनीचे हस्तांतर रद्द करुन त्या पूर्वलक्षी प्रभावाने वतनदाराच्या वारसांच्या हवाली करण्यात याव्यात. इत्यादी प्रश्न घेवून युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे सुधीर ल. जगताप चिंचवड पोटनिवडणूकीत उमेदवारी करीत आहे व त्यांच्या उमेदवारीमुळे वतनी जमिनदारांच्या समस्यांना वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करीत आहोत.