मुंबई,दि.14 ऑगस्ट 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार !
शहात्त्त्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देते. या गौरवास्पद प्रसंगी आपल्या सर्वांना संबोधित करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. एक स्वतंत्र देश म्हणून भारत आपली 75 वर्षे पूर्ण करत आहे.
14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या-भीषण वेदनांचा स्मृती-दिन म्हणून पाळला जात आहे. हा स्मृतीदिन पाळण्याचा उद्देश, सामाजिक सद्भावना, जनतेचं सक्षमीकरण आणि एकोप्याला अधिक बळ देणे हा आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी, आपण वसाहतवादी शासनाच्या बेड्या तोडून टाकल्या होत्या. त्या दिवशी आपण आपल्या नियतीला नवे स्वरूप देण्याचा संकल्प केला होता. त्याच शुभदिनाचा वर्धापन दिन साजरा करत असताना, आपण सगळे, स्वातंत्र्यसैनिकांना आदरपूर्वक वंदन करतो. आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकू, यासाठी, त्यांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले.
भारताचं स्वातंत्र्य आपल्यासह जगात लोकशाहीच्या प्रत्येक समर्थकासाठी उत्सवाचं कारण आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आणि विचारवंतांनी, आपल्या लोकशाही शासन प्रणालीच्या यशस्वितेबाबत शंका व्यक्त केली होती. त्यांच्या या शंकांच्या मागे अनेक कारणंही होती. त्या काळी, लोकशाही व्यवस्था ही आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांपर्यंतच मर्यादित होती. परदेशी शासनकर्त्यांनी, कित्येक वर्षे, भारताचे शोषण केले होते. यामुळे, भारताचे लोक, दारिद्र्य आणि निरक्षरतेच्या संकटांचा सामना करत होते. मात्र, भारतीयांनी त्या सर्व लोकांच्या शंका खोट्या ठरवल्या. भारताच्या या मातीत लोकशाहीची मुळे, सातत्याने खोलवर रुजत गेली आणि अधिक मजबूत होत गेली.
बहुतांश लोकशाही देशांत, मत देण्याचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता. मात्र, आपल्या गणराज्याच्या सुरुवातीपासूनच, भारताने सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार केला. अशाप्रकारे, आधुनिक भारताच्या निर्मात्यांनी, प्रत्येक प्रौढ नागरिकाला राष्ट्रनिर्मितीच्या सामूहिक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी प्रदान केली. लोकशाहीची खरी ताकद काय असते, याचा परिचय संपूर्ण जगाला करुन देण्याचे श्रेय भारताचे आहे.
भारताचे हे यश केवळ योगायोग नाही, असे मी मानते. संस्कृतीच्या प्रारंभापासूनच भारत-भूमीच्या संत-महात्म्यांनी सर्व प्राणिमात्रांच्या समानतेवर आणि एकतेवर आधारित जीवनदृष्टी विकसित केली होती. महात्मा गांधी यांच्यासारख्या महानायकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात, आपल्या या प्राचीन जीवनमूल्यांची आधुनिक काळात पुनर्स्थापना करण्यात आली. याच कारणामुळे आपल्या लोकशाहीत, भारतीयत्वाची तत्वे देखील दिसून येतात. गांधीजी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे आणि सर्वसामान्यांना अधिकारसंपन्न बनवण्याचे पुरस्कर्ते होते.
गेल्या 75 आठवड्यांपासून आपल्या देशांत स्वातंत्र्यलढ्याच्या महान आदर्शांचे स्मरण केले जात आहे. मार्च 2021 मध्ये दांडी यात्रेच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देत, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सुरु करण्यात आला. या युगप्रवर्तक आंदोलनानं आपल्या स्वातंत्र्यलढ्याला जागतिक पटलावर नेले. या आंदोलनाचा गौरव करत, या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. हा महोत्सव भारताच्या जनतेला समर्पित आहे. देशबांधवांनी मिळवलेल्या यशाच्या आधारावर, “आत्मनिर्भर भारता’ची निर्मिती देखील, याच उत्सवाचा एक भाग आहे. संपूर्ण देशात होत असलेल्या या महोत्सवात, प्रत्येक वयोगटातील नागरिक, अतिशय उत्साहाने सहभागी होत आहेत. हा भव्य महोत्सव आता, ‘ घरोघरी तिरंगा अभियाना’ सह पुढे जातो आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात, आपला तिरंगा, अतिशय दिमाखात फडकतो आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांप्रती, इतक्या व्यापक स्तरावर लोकांमध्ये जागृती झाल्याचे पाहून, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अतिशय आनंद झाला असता.
आपला गौरवास्पद स्वातंत्र्यलढा या विशाल भारत भूमीत अत्यंत धैर्य आणि शौर्याने लढवला गेला होता. अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी शौर्याची आदर्श उदाहरणे जगासमोर ठेवली आणि राष्ट्रजागृतीची मशाल नव्या पिढीच्या हातात सोपवली. अनेक वीर योद्धे तसेच, त्यांचे संघर्ष, विशेषतः शेतकरी आणि आदिवासी समुदायांच्या वीरांचे योगदान मात्र, दीर्घकाळपर्यंत, स्वातंत्र्यलढ्याच्या सामूहिक स्मृतींपासून बाहेरच राहिले होते. दरवर्षी 15 नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा सरकारने गेल्या वर्षी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आपले आदिवासी महानायक, केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक गौरवाचेच प्रतीक नाहीत, तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.
प्रिय देशबांधवांनो,
एका राष्ट्रासाठी, विशेषत: भारतासारख्या प्राचीन देशाच्या दीर्घकालीन इतिहासात, 75 वर्षांचा काळ, तसा तर अतिशय छोटा वाटणारा काळ आहे. मात्र, व्यक्तिगत पातळीवर, हा कालखंड, एका जीवनप्रवासासारखा आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या जीवनकाळात अद्भुत परिवर्तने पाहिली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्व पिढ्यांनी कसे कठोर परिश्रम केले, कशा प्रकारे मोठमोठ्या आव्हानांचा सामना केला आणि त्या सगळ्यांनी आपले नशीब कसे स्वतः घडवले, या सगळ्याचे हे ज्येष्ठ नागरिक साक्षीदार आहेत. या काळात आपण जे काही शिकलो आहोत, ते सगळे अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण आपण राष्ट्राच्या प्रवासातल्या एका ऐतिहासिक टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. आपण सगळे २०४७ मधल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी उत्सवापर्यंतच्या 25 वर्षांच्या काळात म्हणजेच देशाच्या अमृतकाळात प्रवेश करत आहोत.
2047 ह्या वर्षापर्यंत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्णपणे साकार करण्याचा संकल्प आपण केला आहे. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, संविधानाची निर्मिती करणाऱ्या विभूतींच्या दूरदृष्टीनुसार, त्यांच्या स्वप्नातला भारत याच काळात आपण साकार केलेला असेल. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपण आधीपासूनच तत्पर आहोत. हा एक असा भारत असेल, ज्याने आपल्या क्षमता प्रत्यक्षात आणल्या असतील.
जगाने, अलीकडच्या काही वर्षांत, नव्या भारताचा उदय होतांना पाहिले आहे. विशेषतः कोविड-19 महामारीच्या प्रकोपानंतर. या महामारीचा सामना आपण ज्याप्रकारे केला, त्याचे सर्वत्र कौतुक केले गेले. आपण देशातच निर्माण केलेल्या लसींसोबत, मानवी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु केली. गेल्या महिन्यात आपण दोनशे कोटी लसमात्रा देण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. या महामारीचा सामना करण्यात, आपली कामगिरी जगातल्या अनेक विकसित देशांपेक्षाही मोठी आहे. या कौतुकास्पद यशासाठी, आपण आपले वैज्ञानिक, डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय व्यावसायिक आणि लसीकरणाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञ आहोत. या संकटकाळात कोरोना योद्ध्यांनी दिलेले योगदान विशेष कौतुकास्पद आहे.
कोरोना महामारीने संपूर्ण जगात मानवी जीवन आणि अर्थव्यवस्थांवर मोठा आघात केला आहे. जेव्हा जग या गंभीर संकटाच्या आर्थिक परिणामांशी लढत होते तेव्हा भारताने स्वतःला सांभाळले आणि पुन्हा अतिशय वेगाने पुढे जाऊ लागला आहे. सध्या भारत जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेला जगात महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारताच्या स्टार्ट अप व्यवस्थेचे यश, विशेषतः युनिकॉर्न्सची वाढती संख्या, आपल्या औद्योगिक प्रगतीचे दिमाखदार उदाहरण आहे. जगात आर्थिक संकट असूनही, भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेण्याचे श्रेय सरकार आणि धोरणकर्त्यांचे आहे.
गेल्या काही वर्षांत भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. पंतप्रधान गति-शक्ती योजनेद्वारे दळणवळण व्यवस्था सुधारल्या जात आहेत. वाहतुकीच्या जलमार्ग, रस्ते आणि हवाईमार्ग इत्यादीवर आधारित सर्व माध्यमांना योग्य प्रकारे एकमेकांशी जोडून संपूर्ण देशात प्रवास सुखकर केला जातो आहे. प्रगतीबद्दल आपल्या देशात दिसून येणाऱ्या उत्साहाचे श्रेय कठोर मेहनत करणाऱ्या आपल्या शेतकरी आणि मजूर बंधू भगिनींना देखील जाते. सोबतच व्यवसायाची समज आणि बुद्धी वापरून समृद्धी निर्माण करणाऱ्या आपल्या उद्योजकांना देखील जाते. सर्वात जास्त आनंदाची गोष्ट ही आहे की देशाचा आर्थिक विकास अधिकाधिक समावेशक होत आहे आणि प्रादेशिक विषमता कमी होत आहेत.
मात्र ही तर केवळ सुरवातच आहे. दूरगामी परिणाम करणाऱ्या सुधारणा आणि धोरणांद्वारे या परिवर्तनासाठीची पायाभरणी आधीपासूनच केली जात होती. उदाहरणार्थ, ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेद्वारे ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेचा पाया रचला जात आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे’ उद्दिष्ट येणाऱ्या पिढ्यांना औद्योगिक क्रांतीच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार करणे आणि त्यांना आपल्या वारशाशी पुन्हा जोडणे, हे देखील आहे.
आर्थिक प्रगतीमुळे देशवासियांचे जीवन अधिकच सुलभ होत आहे. आर्थिक सुधारणांसोबतच लोककल्याणासाठी नवी पावले उचलली जात आहेत. ‘पंतप्रधान आवास योजने’च्या मदतीने गरिबांकडे स्वतःचं घर असणं हे आता स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरले आहे. त्याचप्रमाणे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर जल‘योजनेने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम सुरु आहे.
या उपाययोजनांचा आणि याच प्रकारच्या इतर प्रयत्नांचा उद्देश देखील सर्वांना, विशेषतः गरिबांना पायाभूत सुविधा पुरविणे, हा आहे. भारतात आज संवेदनशीलता आणि करुणा या जीवन मूल्यांना प्राथमिकता दिली जात आहे. या जीवन मूल्यांचा मुख्य उद्देश आपल्या वंचित, गरजू आणि उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी काम करणे, हा आहे. आपल्या राष्ट्रीय मूल्यांना, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये म्हणून भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले आहे. देशाच्या प्रत्येक नागरीकाला माझं आवाहन आहे की त्यांनी आपल्या मुलभूत कर्तव्यांची माहिती घ्यावी, त्यांचे पालन करावे, ज्यामुळे आपले राष्ट्र नव्या उंचीवर पोहोचू शकेल.
प्रिय देशबांधवांनो,
आज देशात आरोग्य, शिक्षण आणि अर्थव्यवस्था तसेच त्यांच्याशी निगडीत इतर क्षेत्रांत जे चांगले बदल दिसून येत आहेत त्यांच्या मुळाशी सुशासनावर विशेष भर दिला जाण्याची प्रमुख भूमिका आहे. जेव्हा ‘राष्ट्र सर्वोपरि’ या भावनेने काम केले जाते, तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक निर्णय आणि कार्यक्षेत्रात दिसून येतो. हा बदल जागतिक समुदायात भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेतही दिसून येत आहे.
भारताच्या नव्या आत्मविश्वासाचा स्रोत देशाचे युवक, शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचं… देशाच्या महिला आहेत. आता देशात स्त्री – पुरुष अशा लैंगिक आधारावर असलेली विषमता कमी होत आहे. महिला अनेक रूढी आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जात आहेत. सामाजिक आणि राजकीय प्रक्रियांमध्ये त्यांचा वाढता सहभाग निर्णायक सिद्ध होणार आहे. आज आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची संख्या चौदा लाखांहून अधिक आहे.
आपल्या देशाच्या अनेक आशा – आकांक्षा आपल्या मुलींवर अवलंबून आहेत. पूर्ण संधी मिळाली तर त्या भव्य यश मिळवू शकतात. अनेक मुलींनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचा सन्मान वाढवला आहे. आपले खेळाडू, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा देशाचा गौरव वाढवीत आहेत. आपले अनेक विजेते समाजाच्या वंचित वर्गांतून येतात. आपल्या मुली लढाऊ वैमानिक ते अवकाश वैज्ञानिक बनण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली विजयपताका फडकावीत आहेत.
प्रिय देशबांधवांनो,
जेव्हा आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, तेव्हा खरे म्हणजे आपण आपल्या ‘भारतीयत्वाचा’ उत्सव साजरा करतो. आपला भारत अनेक विविधतांनी समृद्ध देश आहे. परंतु या विविधतेसोबतच आपणा सर्वांमध्ये काही ना काही असे आहे जे एक समान आहे. हीच समानता आपणा सर्व देशबांधवांना एका सूत्रात ओवते आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने पुढे जाण्याची प्रेरणा देत असते.
भारत आपले डोंगर, नद्या, तलाव आणि वने तसेच त्या क्षेत्रातल्या जीवसृष्टीमुळे अत्यंत विलोभनीय देश आहे. आज जेव्हा आपल्या पर्यावरणासमोर नव नवी आव्हाने येत आहेत, तेव्हा आपल्याला भारताच्या सौंदर्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचे दृढतेने संरक्षण केले पाहिजे. जल, माती आणि जैव विविधतेचे संरक्षण हे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपले कर्तव्य आहे. मातेसमान निसर्गाची काळजी घेणे हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग राहिले आहे. आपण भारतीय आपल्या पारंपारिक वनशैलीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला योग्य मार्ग दाखवू शकतो. योग आणि आयुर्वेद जागतिक समुदायाला भारताची अमूल्य भेट आहे ज्याची लोकप्रियता जगात सातत्याने वाढत आहे.
प्रिय देशबांधवांनो,
आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या मातृभूमीने दिले आहे. म्हणूनच आपण आपल्या देशाचे संरक्षण, प्रगती आणि समृद्धीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या अस्तित्वाची सार्थकता एका महान भारताच्या उभारणीतच असेल. कानडी भाषेच्या माध्यमातून भारतीय साहित्य समृद्ध करणारे महान राष्ट्रवादी कवी ‘कुवेम्पु’ यांनी म्हटले आहे:
नानु अलिवे, नीनु अलिवे
नम्मा एलु-बुगल मेले
मूडु-वुदु मूडु-वुदु
नवभारत-द लीले।
म्हणजेच,
‘मी असणार नाही
न राहशील तू
परंतु आपल्या अस्थीमधून
उदय होईल, उदय होईल
नव्या भारताच्या महागाथेचा.’’
त्या राष्ट्रवादी कवींचे हे स्पष्ट आवाहन आहे की मातृभूमी तसेच देशवासियांच्या उत्थानासाठी सर्वस्वाचे बलिदान करणे हा आपला आदर्श असायला हवा. हे आदर्श आत्मसात करण्याचा मी आपल्या देशाच्या युवकांना विशेष आग्रह करते. हा युवा वर्गच 2047 च्या नव्या भारताची निर्मिती करेल.
आपले भाषण संपविण्यापूर्वी मी भारताची सशस्त्र दले, विदेशात असलेले भारतीय दूतावास आणि आपल्या मातृभूमीचा गौरव वाढविणारे अनिवासी भारतीय, यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देते. मी सर्व देशवासियांना, सुखी आणि मंगलमय आयुष्यासाठी शुभेच्छा देते.
धन्यवाद,
जय हिन्द!