इंदापूर नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा पर्दाफाश
पिंपरी,दि.24 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बोगस कागदपत्रे सादर करुन रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल 55 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आणला. त्यामुळे अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेवरुन प्रशासन आणि काही राजकीय पदाधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर केल्याचे पुराव्यानिशी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, महापालिका दक्षता समिती काय तपास करते? असा सवालही कामठे यांनी उपस्थित केला.महापालिका सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. तसेच, महापालिका आयुक्त राजेश पाटील प्रशासन प्रमुख म्हणून उपस्थित होते.
नगरसेवक कामठे म्हणाले की, अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते गटर सफाईच्या कामासाठी राजकीय हस्तक्षेप करुन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन या कामाचा ठेका मिळवण्याचा घाट घातला आहे. सभागृहातील एका ज्येष्ठ नगरसदस्याने याला हातभार लावला आहे.
… अन्यथा नगरसेवकपदाचा त्याग करणार : कामठे
भाजपाने भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्यावर निवडणूक लढली आणि जिंकलीसुद्धा. ज्या-ज्या वेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी न डगमगता माझी भूमिका मांडली आहे. आता वर्षाच्या शेवटी समोर आणलेल्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा छडा महापालिका आयुक्तांनी लावावा. रस्ते गटर सफाईच्या निविदा प्रकियेत निर्णय घेण्याचे अधिकार एका लाच प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्याकडे दिले आहेत. रस्ते सफाईच्या निविदेत अनियमितता असून, याबाबत सखोल चौकशी करावी. येत्या आठ दिवसांत त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा नगरसेवकपदाचा त्याग करुन पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या कररुपी पैशावर डल्ला मारणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे, अशा इशाराही नगरसेवक तुषार कामठे यांनी दिला आहे.
नगरसेवक कामठे यांना धमकी अन् दबावही…
गेल्या पाच वर्षांत मला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असताना मला संघर्ष करावा लागला. पण, हा संघर्ष लोकांच्या हितासाठी आहे. त्यासाठीच लोकांनी मला नगरसेवक केले आहे. ‘‘इंदापूर नगर परिषदेतील बोगस कागदपत्रे सभागृहात सादर करु नको.’’ यासाठी मला तीन तास समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याउपर मला धमकीही देण्यात आली. पण, राजकीय दबाव आणि धमकीला मी घाबरणार नाही. पिंपरी-चिंचवडमधील सामान्य जनता माझ्या सोबत राहील, असा दावाही नगरसेवक तुषार कामठे यांनी केला आहे.