ना राजकारणाचं ज्ञान, ना प्रभागातील समस्यांची जाण, ना सामाजिक भान!
पिंपरी,दि. १४ डिसेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे पडघम जसजसे वाजू लागले आहेत तसतसे शहराच्या गल्लीबोळातून नवनवीन ‘भावी नगरसेवकां’ची पैदास होऊ लागली आहे. ज्याच्याकडे राजकारणाचं ज्ञान नाही मात्र बापजाद्याचा अमाप पैसा किंवा राजकीय वारसा आहे त्यांनाही नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत.शहरातील कोणत्याही प्रभागात गेलात तर त्या प्रभागातील चौकाचौकात, गल्लीबोळात अशा भुरट्या भावी नगरसेवकांचे फ्लेक्स जागोजागी झळकताना दिसतात. प्रभागातीलच पाच – दहा बेरोजगार तरुण गोळा करून त्यांना सकाळचा चहा मिसळ आणि रात्रीची दारू पाजली की कट्टर समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ते लगेच मागे मागे फिरायला मिळतात. मग या भावींना आपण नगरसेवक असल्याचा फिल देखील त्यांना यायला सुरवात होते.
विशेष म्हणजे हे सर्व भावी नगरसेवक ज्याप्रकारे पावसाळा आल्यावर लपलेली बेडकं बाहेर पडतात तशी फक्त निवडणूक जवळ आली की निवडणुकीपुरतीच बाहेर पडतात. दरम्यानच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत हे कुठेच दिसत नाहीत. आणि प्रभागातील एकाही प्रश्नावर हे आवाज उठवत नाहीत. की साधं प्रशासनाला एक निवेदनही देत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे यांना प्रभागातील समस्याच माहीत नसतात. आणि माहीत असल्या तरी बघू निवडणूक आल्यावर या वृत्तीमुळे गप्प राहतात.अनेकदा प्रभागातील मतदारांनाही हा कोण नवीन उगवला? असा प्रश्न पडण्याइतपत हा भावी नगरसेवक नवीन असतो. पण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फाफट कार्यक्रम घेऊन आपण किती कार्यक्षम आहोत हा दाखविण्याचा हास्यास्पद खटाटोप हे करीत असतात. त्यातच कोणी अनुभवी नागरिकाने मार्गदर्शन केले तरी त्यांचा सल्ला फाट्यावर मारत आपण किती अतिशहाणे आहोत हे दाखवून द्यायचे. याचा शेवट हा आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे हे मात्र त्यांच्या ध्यानातही येत नाही.
अशा संधीसाधु आणि भुरट्या भावी नगरसेवकांना मतदारांनी त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे. भावी असो की विद्यमान नगरसेवक ‘पाच वर्षात तुम्ही प्रभागासाठी काय केलं? हा जाब सामान्य मतदारांनी विचारला पाहिजे. पैसा आणि दारू, मटणाला न भुलता तळमळीने काम करणाऱ्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे. तर आणि तरच प्रभागातील सच्चा आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि अशा भुरट्या भावी नगरसेवकांच्या उत्पत्तीला आळा बसेल.
गंमतीशीर बाब म्हणजे काही विद्यमान नगरसेवक ही भावी नगरसेवकांन प्रमाणेच आहेत.साडेचार वर्षात प्रभागात फिरले नाहीत.तर काहीनी साडेचार वर्ष सेटलमेंट सारख्या प्रकरणात घालवली तर काहीनां अजुन पालिका प्रशासनही समजत नाही.वार्डा प्रभागासाठी काम करायच सोडुन मौजमजे साठी लग्नसंभारभात नाव पुकारण्याइतपत त्यांनी मजल मारली त्यामुळे यंदा अशा आजी माजी भावी नगरसेवकांना मतदार राजाने दणका द्यायलाच हवा.आणि कामकरणारे समाजसेवक प्रभागाचा अभ्यास करुन समस्या पालिका प्रशासनामार्फत सोडवणारे नगरसेवक निवडुन दिले पाहिजे,तुम्हि ठरवा आता नक्की करायच काय ? अशा भुरट्यांना जागा दाखवा नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही तर ञास दायक ठरेल.