पिंपरी,दि.२७ मार्च२०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) : – राज्यातील माध्यम प्रतिनिधी कोरोना संक्रमणाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे राज्यातल्या पत्रकारांना कोरोना लसीचे संरक्षण देण्यात यावे. विरोधी पक्ष नेते स्वर्गीय दत्ता काका साने कोरोना महामारीत शेकडो कार्यकर्त्यांसह जीवाची पर्वा न करता अविरत जनसेवा करत होते.पण कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात कायम संकट काळात धावुन येणारा सेवक हरपला. त्यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व विविध राजकीय कार्यकर्ते देखील कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता जनसेवा करीत होते. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना महामारीच्या काळात जनसेवा केलेल्या सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात यावी. या विषयी गांर्भीयाने विचार करण्यात यावा.
कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलिस यांना लस देण्यात आली. आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र पत्रकारांना कोरोना लस देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर निर्णय झालेला नाही पत्रकार वृत्तसंकलनासाठी जातात तेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतात त्याचप्रमाणे त्यांना वृत्तसंकलनासाठी रुग्णालयांमध्ये जावे लागते त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.अनेक माध्यम प्रतिनिधींनी लोकांपर्यंत बातम्या पोचविण्यासाठी जीव धोक्यात घालून काम केले आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवाना त्वरीत मोफत कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी यश दत्ता साने यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.