Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप;नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम...

पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप;नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

चिंचवड, दि.08 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र पोलीसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड येथील रामकष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ-365’ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले.

यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, ‘गोकी’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या पोलिस दलाला शौर्याची, त्यागाची मोठी परंपरा आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले, त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेऊन प्रत्येक पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. ‘कोरोना’ काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन जोखीम पत्करुन चांगल्याप्रकारे सेवा केली आहे. या काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चित घेतली जाईल. कोरोना काळात जोखीम पत्करुन पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करुन आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त राहावे.

पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्टस् सायकल देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे पोलीस दलाचे आरोग्य निश्चितच सुधारेल, त्यांची क्षमता वाढेल. त्याचबरोबर पोलिसांची प्रतिमा अधिक ‘स्मार्ट’ होईल. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाच्यावतीने या विभागातील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रीया सुरु आहे. पोलीसांना दर्जेदार निवास व्यवस्था, आवश्यक वाहने व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पोलीसांसाठी घरांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे राज्यातील एक दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक जागा, सोयीसुविधा, मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. याबरोबरच पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनसाठी देखील आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल. तथापि, पोलिसांनी देखील प्रत्येक नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करायला हवी. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या मनात पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम पोलिसांनी करावे. या ठिकाणी येणारा नागरिक विश्वासाने येऊन समाधानाने बाहेर पडायला हवा. मुली, महिला, अन्य कोणताही नागरिक कुठल्याही भागात सुरक्षितपणे वावरू शकेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहून काम करावे. गुन्हेगारी मोडून काढून शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या मनात विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे. प्रास्ताविकात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ‘सीएसआर’ निधीतून सामाजिक कामासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. विशाल गोंडल यांनी ‘गोकी’ ‘हेल्थ 365’ बाबत माहिती दिली तर आभार अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे यांनी मानले.

Previous articleहेमंत नगराळे महाराष्र्ट राज्याचे नवे पोलिस महासंचालक
Next articleभगवान महाविर जैन यांच्या विचारांचा वारसा असाच पुढे चालत राहावा – ॲड बाळासाहेब आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 2 =