पिंपरी,दि. 07 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोना काळात केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊन मुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. या लॉकडाऊन काळात तीन महिण्यांहुन जास्त काळ शहरात रिक्षा वाहतूक बंद होती. अद्यापही रिक्षा वाहतूक व्यवसाय पुर्ववत सुरु झालेला नाही. या काळात झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी राज्यातील सर्व रिक्षा चालक, मालकांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वाहतुक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजीज शेख यांनी केली आहे.
गुरुवारी (दि. 7 जानेवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शेकडो रिक्षा चालक, मालक मोर्चाने आकुर्डी येथिल तहसिल कार्यालयासमोर येऊन त्यांनी आंदोलन करीत निदर्शने केली. यानंतर आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार चौबे यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, वाहतुक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राम बनसोडे, वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र सचिव हरेश देखणे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, सचित सुर्यवंशी, आकाश तांगडे, इम्रान पठाण, शुभम वरकड, गणेश धराडे, ओंकार मानकर, आकाश मानकर, आकाश गायकवाड, दत्ता कोळी, दादू पवार, आकाश देमगुंडे, कृष्णा सवणे, संययसिंह कौर, लव्हली सिंग, सविता आल्हाट, संतोष गायसमुद्रे आदींसह शेकडो रिक्षा चालकही उपस्थित होते.
यावेळी अजीज शेख यांनी सांगितले की, शहरातील बहुतांश रिक्षा चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत. लॉकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय पुर्ण बंद होता. अजूनही शाळा सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे शाळेची वर्दी करणा-या रिक्षा चालकांचा व्यवसाय बंदच आहे. रिक्षा सुरु करण्यास शासनाने आता परवानगी दिली असली तरी, प्रवाशांमध्ये अद्यापही भितीचे वातावरण आहे. व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरु नाही. परंतू कर्जाचे व्याज आणि कौटूंबिक खर्चाला पायबंद नाही. अशा दुहेरी विवंचनेत रिक्षा चालक, मालक आपली उपजिवीका चालवित आहेत. उत्पन्नावर परिणाम झाला असतानाही कर्ज देणा-या विविध आस्थापनांचे वसूली करणारे कर्मचारी गुंडांप्रमाणे वर्तणूक करीत रिक्षा चालकांना, मालकांना तसेच त्यांच्य कुटूंबियांना कर्जाचे हप्ते व व्याज भरण्याबाबत तगादा लावत आहेत. यामुळे सर्वांचे कुटूंबिय देखिल दहशतीच्या वातावरणात आहेत. रिक्षा व्यवसाय हा सेवा व्यवसाय आहे. हे चालक बाराही महिने प्रवाशांची सेवा करुन आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवित असतात. रिक्षाचे वार्षिक नोंदणी, विमा तसेच इतर सर्व कर नियमित भरुन रिक्षा व्यवसाय करतात. परंतू लॉकडाऊन मुळे त्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. त्यांना शासनाने सहानुभूतीपुर्वक प्रत्येकी वीस हजार रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच सर्व रिक्षा चालकांचे, मालकांचे रिक्षांवरील कर्जाचे किमान एक वर्षाचे पुर्ण व्याज माफ करावे. तसेच वीम्याचे हप्ते आणि नुतणीकरणाची रक्कम पुर्वलक्षी प्रभावाने वजावट करुन गृहीत धरावे अशी मागणी केली आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील एक महिण्याने रिक्षा चालक, मालकांचे राज्यव्यापी आंदोलन करु असा इशारा अजीज शेख यांनी दिला.