मुंबई, दि.10 डिसेंबर2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी- महारुद्र सिरसट):- शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाला तसेच ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने ‘शरद पवार ग्रामसमृध्दी योजना’ राबविण्याचे निश्चित केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होणार आहे,असे रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
‘मनरेगा’च्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत 4 वैयक्तिक कामांचा समावेश करुन अनिवार्यपणे सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग यांचा समावेश योजनेत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना भरीव अनुदान मिळणार आहे.
महाराष्ट्रात अनेकवेळा पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे कोलमडली आहे. अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. शेतीपुरक व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल व शेतीसाठी उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत निर्माण होण्यास मदत होईल. ‘शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेमुळे’ शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडणार आहे, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.