चैत्यभूमी,दि.06 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर भीम अनुयायांची अलोट गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण सुरु होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळई आठ वाजताच चैत्यभूमीवर दाखल झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थोड्या उशिराने चैत्यभूमीवर पोहोचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर लोकराज्य मासिकाचं प्रकाशन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कोरोनामुळे राज्य सरकारने चैत्यभूमीवर गर्दी करण्याचं टाळत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करण्याचे भीम अनुयायांना आवाहन केले होते. या आवाहनाला भीम अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला.