नवी दिल्ली, 07 डिसेंबर2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी भर दिला. नुकतेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) 50 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.
जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांमध्ये असण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कृषी, आधुनिक औषध, पारंपारिक औषध, नवीन शिक्षण धोरण, लघु व मध्यम उद्योग, कामगार क्षेत्र यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये सरकारने पावले उचलली आहेत आणि सुधारणाही केल्या आहेत, असे ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन अँड विज्ञान प्रसार यांच्या वतीने ‘ऑन द अदर साईड ऑफ पेंडेमिक’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.
कोविड या साथीच्या रोगाने बर्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि काही गोष्टी करण्याचे नवीन मार्गही दाखवले आहेत आणि यापैकी बऱ्याच गोष्टी कोव्हिडनंतरच्या काळातही राहणार आहेत आणि आपल्याला कोव्हिडनंतरच्या जगात राहण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक व्यवस्था असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड -19 मुळे झालेल्या परिणामांनंतर पुढील काही तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील येत्या 20 ते 30 वर्षांत अर्थव्यवस्थेमध्ये सरासरी 7-8 टक्के वाढ होईल आणि 2047 पर्यंत ती तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, शेती, दळणवळण, इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रिक स्टोरेज, क्वांटम टेक्नॉलॉजी या सर्व क्षेत्रात नावीन्यतेचा वापर करून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इच्छित दराने वाढ होण्यासाठी डीएसटी ने उचललेल्या विविध पावलांविषयी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी माहिती दिली. नाविन्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्टार्टअपची संख्या वाढविण्यास मदत करण्यासाठी डीएसटीने उचललेल्या उपक्रमांविषयीही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टम अंतर्गत तीन उत्कृष्टता केंद्राचे (सीओई) विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नुकतेच सचिव प्रोफेसर आशुतोष शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्राध्यापक शर्मा यांनी हिमालयीन प्रदेशातील हवामान बदलांच्या संशोधनाचे नेतृत्व करण्यासाठी या केंद्रांना आवाहन केले.