पिंपरी,दि.07 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोविडच्या परिस्थितीमुळे शासनाचे अर्थकारण अडचणीत आले आहे आणि ठेकेदारांची मदार ब-यापैकी शासनावर असते. त्यामुळे कामे मिळविण्याच्या स्पर्धेत अडकून बोजा वाढविण्यापेक्षा नियोजनबध्द प्रगती साधण्यासाठी ठेकेदारांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन अर्थतज्ञ व पॉझिव्ह्यू कन्सल्टींगचे चेअरमन विनित व्यंकटेश देव यांनी केले.
पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विनित देव यांनी कोविड आणि ठेकेदारांचे आर्थिक नियोजन या विषयावरील व्याख्यानात वरील प्रतिपादन केले. यावेळी ज्येष्ठ ठेकेदार अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर्सचे सर्वेसर्वा सुनिल अजवानी, पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बिपिन नाणेकर, ज्येष्ठ ठेकेदार प्रशांत उर्फ बंडू खुळे यांसह पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवर ठेकेदार उपस्थित होते.
विनित देव यांनी ठेकेदारांना संबोधित करताना ताळेबंद, नियोजन आणि पुढील अंदाजपत्रक यांचा सखोल अभ्यास करून ठेकेदारांनी वाटचाल करण्याची गरज स्पष्ट केली. यावेळी ठेकेदारांनी महापालिका आणि शासनाबरोबर काम करताना उद्भवणा-या अडचणींचा पाढा वाचला व असोसिएशनने यावर तोडगा काढण्यासाठी काम करावे अशी मागणी केली.
पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी अशोक शिरोळे, संभाजी दौंडकर, सचिन जाधव, महेश शिंदे यांनी ही सर्वसाधारण सभा यशस्वी व्हावी म्हणून परिश्रम घेतले. सभेचे निवेदन व सुत्रसंचलन विजय बोत्रे यांनी केले.
पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेचा प्रारंभ दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी डावीकडून अशोक शिरोळे, अटल बुधरानी, बिपिन नाणेकर, प्रशांत खुळे, विनित देव, सुनिल अजवानी, भालचंद्र लष्करे, सचिन जाधव, परमानंद क्रिपलानी, महेश शिंदे उपस्थित होते.