मावळ,दि.01आॅक्टोबर2020 ( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी – एस.चव्हाण ) :- कोरोनाच्या संकटकाळात पालकांनी शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय संस्थेचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू ठेवणे अशक्य आहे तसेच शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे.असे मावळ तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांच्या संस्थाचालकांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर सांगितले होते.
या संदर्भात बोलताना आमदार सुनिल शेळके म्हणाले, कोरोनाची परिस्थिती भयानक असताना सामाजिक बांधिलकी न जपता काही संस्थाचालक आर्थिक हित जोपासत संस्था चालवतात, या संस्थाकडे लाखो रुपयाच्या ठेवी असुनही संस्था अडचणीत आहे असे सांगतात. तसेच नगरपरिषदेच्या करोडो रुपयांचे भुखंड लाटणाऱ्या संस्थाचालकांना जर संस्था चालवता येत नसेल, तर त्यांनी आपली संस्था समाजातील सेवाभावी संस्था आहेत त्यांना चालवायला दयाव्यात. मावळ तालुक्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांकडून सक्तीने फी वसुली करुनही शिक्षकांना निम्मे वेतन दिले जात आहे. खासगी शाळातील शिक्षक आधीच कमी वेतन श्रेणीवर काम करीत असल्याने हा शिक्षकांवर देखील अन्याय आहे.
कोरोना संकटकाळात पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्व क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले आहेत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून शैक्षणिक संस्थांकडून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे.
शाळेच्या फी साठी पालकांकडे तगादा लावला जात असल्याने अशा परिस्थितीत मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले असताना जर शुल्क भरणे शक्य होत नसेल तर आम्ही आता आमच्या मुला-मुलींना शिकवायचे की नाही? असा प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही शैक्षणिक फी साठी पालकांना सक्ती करु नका असे स्पष्ट आदेश शाळांना दिले आहेत. मात्र, काही इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
आपल्या मुलांना त्रास होईल या भीतीने पालक शाळेच्या विरोधात जाण्यास धजावत नाही. याचाच गैरफायदा घेत खाजगी शैक्षणिक संस्था विविध कारणे देत पालकांना फीसाठी वेठीस धरत आहे. यावर आमदार सुनिल शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्था चालविण्यास असमर्थ असलेल्या संस्थाचालकांनी फी साठी पालकांवर दडपशाही करण्याऐवजी आपल्या संस्था सेवाभावी संस्थांकडे चालवायला द्याव्यात’ अशा शब्दात शेळके म्हणाले…