मुंबई,दि.19 सप्टेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचे सांगितले आहे.परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून स्मारकासाठीचा निधी कोविडसाठी वापरावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, या पुतळ्याला माझा पूर्वीपासून विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभे करावे. आज त्याची नितांत गरज आहे. हा निधी या कामी वापरल्यास अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल.करोनातून लोकांना वाचवणे ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी करोनासाठी खर्च करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा आंतरराष्ट्रीय केंद्रासाठी दिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पत्राचे अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय केंद्र उभारावे. त्यासाठी सरकारवर कोणताही आर्थिक बोजा नाही. त्यासाठी लागणारा खर्च केंद्र सरकार देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.