पिंपरी,दि. 22 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेस फोन करुन आणि दरवाजा ठोठावून त्रास देणाऱ्या सुरक्षा रक्षकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना 16 जुलै रोजी सिंहगड रस्ता परिसरात घडली. लोकेश दिलीप मते असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णावर उपचार केले जातात. संबंधीत ठिकाणी एका कोरोनाबाधित 27 वर्षीय महिलेवरही तेथे उपचार सुरु होते. केंद्रात एकमेव महिला रुग्ण होती. त्याठिकाणी लोकेश मते हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 16 जुलैला मध्यरात्री महिला तिच्या खोलीत आराम करत होती. त्यावेळी लोकेश सुरक्षेच्या कारणास्तव महिलेच्या खोलीमध्ये गेला. त्याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर रात्री एक वाजता त्याने महिलेच्या मोबाईलवर मिस्ड कॉल केला. काही वेळाने मॅडम आपल्याला काही अडचण असल्यास सांगा’ अस मेसेज टाकुन महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर रात्री दोन वाजल्यापासून सकाळपर्यंत तो सतत महिला झोपलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावून त्रास देत होता. फोनवर देखील अश्लील शब्दात बोलत होता. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली. या प्रकाराबाबत महिलेने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे व शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांना माहिती दिली. त्यानुसार संघटनेने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्ताना पत्र पाठवुन कारवाई करण्याची मागणी केली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करुन लोकेशला तत्काळ अटक केली.पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.