मुंबई दि 30 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेसच्या (IRSS), 1999 च्या तुकडीचे अधिकारी रवींद्र भाकर यांनी आज केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी भाकर पश्चिम रेल्वेचे सचिव आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते.
चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी भाकर यांचे स्वागत केले आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून मंडळाने आपल्या कामकाजाचे संपूर्ण डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणाचे महत्वपूर्ण काम सुरू केले आहे, हे काम भाकर यांच्या कार्यकाळात उत्तमतेने पार पडावे, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जयपूर इथल्या ‘एमएनआयटी’संस्थेमधून रवींद्र भाकर यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी म्हणून भाकर यांना चांगला अनुभव असून भारतीय रेल्वेमध्ये त्यांनी विविध महत्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. त्यांना उत्कृष्ट कामगिरीचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये रेल्वे मंत्र्यांचा राष्ट्रीय पुरस्कार आणि पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या सेवेत असताना ‘अनुकरणीय सेवा प्रदानकर्ता अधिकारी’ म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये विविध कामांच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेत रवींद्र भाकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच आधुनिक जनसंपर्क तंत्र विकसित केले. ई-खरेदी प्रक्रियेची अंमलबजावणी केली. तसेच विविध बहुविध तर्कसंगत योजना तयार करून त्यांची सांगड वाहतूक व्यवस्थापनाशी घालून अंमलबजावणी करण्याचे कार्य भाकर यांनी केले.