Home कोल्हापुर मुख्यमंत्र्यांची अंबाबाई चरणी प्रार्थना ; कोरोनाचे संकट समूळ नष्ट होवो

मुख्यमंत्र्यांची अंबाबाई चरणी प्रार्थना ; कोरोनाचे संकट समूळ नष्ट होवो

0

कोल्हापूर,दि.20जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. कोल्हापूरातही सीपीआरमध्ये सुसज्ज कोरोना वार्ड उपलब्ध झाला आहे, ही चांगली बाब आहे. मात्र या आरोग्य सुविधा वापरण्याची वेळ महाराष्ट्रावर येवू नये. नागरिक आनंदी आणि निरोगी राहो. कोरोनाचे हे संकट समूळ नष्ट होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) कडे केली.

येथील सीपीआरमधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह 14 बेडचा कोरोना वार्ड क्रोम क्लिनीकल रिसर्च ॲन्ड मेडीकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देणगी रुपाने तयार करुन दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याचे आज ऑनलाईन लोकार्पण केले. या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषा अध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, रिसर्च ॲन्ड मेडीकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. धनंजय लाड आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा शासन आणि लोक सहभागातून अधिक सक्षम करत आहोत, यासाठी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोरोनाचे संकट कदाचित गंभीर झाल्यास आरोग्य सुविधा कमी पडू नये, यादृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहेत. मुंबईत तर देशातील सर्वात मोठं कोव्हिड हॉस्पिटल उभं केलं आहे. याबरोबरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यातही आरोग्य सुविधा सक्षम आणि सुसज्ज केल्या जात आहेत. यापुढील काळात कोरोनाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता गृहित धरुन शासन आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष आणि सजग आहे. कोरोनाच्या युध्दात प्रशासकीय यंत्रणा विशेषत: आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे. यापुढेही आरोग्य विषयक कामात कसूर होणार नाही. उलट कोरोना व्हायरस नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपणच माणसांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले.

कोरोनाचे संकट जरी गंभीर असलं तरीही गडबडून न जाता त्याच्या मुकाबल्यासाठी आरोग्य सुविधा वाढविण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाने ज्या वाईट गोष्टी दिल्या, त्याबरोबरच चांगल्याही गोष्टी दाखविल्या. आरोग्याकडे आणि कुटुंबाकडे कोरोनाने बघायला शिकवले. राज्यात सर्वत्र आरोग्याच्या सुविधा वाढवायला लागलोय आहोत. मुंबईत मोठं कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याबरोबरच केंद्राकडे आणखीन व्हेंटीलेटरची मागणी केली आहे. पीपीई किट, एन-95 मास्कच्या उपलब्धतेवरही अधिक भर दिला आहे. कोरोनामुळे माणसा माणसात अंतर ठेवणे गरजेचे असले तरीही एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा महाराष्ट्रातील जनतेने जोपासली आहे. एप्रिलमध्ये रक्ताचा तुटवडा होता त्यावेळी शासनाच्यावतीने रक्तदान करण्याचे आवाहन केल्याने राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर रक्तदान केल्याने रक्ताची टंचाई दूर झाली. अशा पध्दतीने संकटाशी लढणे महाराष्ट्राच्या रक्तात आहे, असेही ते म्हणाले.

गेली अडीच, तीन महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवून पुनश्च: हरी ओम आणि मिशन बिगीन अगेनने पुन्हा सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. कोल्हापुरातील सीपीआरमध्ये रिसर्च ॲन्ड मेडीकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेड यांनी लोक सहभागातून सुसज्ज कोरोना वार्ड उपलब्ध करुन दिल्याबद्दल  क्रोमचे कार्यकारी संचालक धनंजय लाड यांना मुख्यमंत्र्यांनी शासनाच्यावतीने धन्यवाद दिले.

या कार्यक्रमात बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले,  कोरोना विरुध्दच्या लढयात क्रोमच्यावतीने सीपीआरमध्ये सुसज्ज वार्ड उपलब्ध करुन देण्याचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. जगभरात कोरोनाचे थैमान घातले असताना कोल्हापुरात मात्र प्रशासन आणि आरोग्य‍ विभागाने कोरोना नियंत्रणात ठेवण्यात केलेल्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला.

प्रारंभी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापुरातील या सीपीआरमध्ये लोकसहभागातून उभारलेल्या सुसज्ज कोरोना वार्ड तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषा अध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, रिसर्च ॲन्ड मेडीकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. धनंजय लाड, हरिबा लाड, डॉ. महेंद्र बनसोडे, नितीन पाटील आदींची भाषणे झाली.

Previous articleWhatsApp झाले down;अनेक फीचर्स अचानक गायब,गोंधळे युजर्स
Next articleयेत्या रविवारी 21 जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातुन दिसणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + two =