बदनापूर,दि.१ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार यांना निलंबित करण्यात आले. कोविड-19 काळात कामातील अनियमितता यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना विषाणुचे अनेक रुग्ण आढळुन आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगर येथून ये-जा केल्यास जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड-19 विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार यांनी मुख्यालयी उपस्थित राहून अत्यावश्यक कामे नियमितपणे पार पाडणे आवश्यक होते. मात्र त्या मुख्यालयी उपस्थित राहत नव्हत्या. कोव्हीड-19 बाबतचे विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष, अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनाधिकृत वाळुसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीमध्ये दुर्लक्ष करणे या कारणावरुन बदनापुरच्या पवार यांना निलंबित करण्यात आले. गुरुवारी जालनाच्या जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार पवार यांना निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.निलंबनाच्या काळामध्ये पवार यांना उप विभागीय अधिकारी कार्यालय, जालना हे मुख्यालय देण्यात आलेले असुन तहसिलदार, बदनापुरचा पदभार पुढील आदेशापर्यंत नायब तहसिलदार (निवडणूक) दिलीप शेनफड सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.