मुंबई,दि.24 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-भारतातील कोरोना विषाणू साथीच्या आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, प्राणघातक कोविड-19 चे प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यांचे उच्च स्तरावर परीक्षण केले जात आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून विविध कामांचा योग्य आढावा घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी हे आपले आघाडीचे योद्धे आहेत आणि ही लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी वैयक्तिक संरंक्षण उपकरणे (पीपीई) सर्वाधिक आवश्यक आहेत. रेल्वे रुग्णालयांमधील पीपीई सूट ची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लक्षात घेऊन, भारतीय रेल्वे कार्यशाळा आणि उत्पादन विभागांकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई सूट तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या कामाच्या सुरुवातीलाच, पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार्यशाळेने आतापर्यंत मुंबई सेन्ट्रल स्थित पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयातील कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बुटांसाठी सुरक्षा कव्हर सह 1050 पीपीई सूट तयार करत एक सर्वोत्तम सुरवात केली आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क रविंद्र भाकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अधिकारी मुंबई सेन्ट्रल स्थित पश्चिम रेल्वेच्या 172 खाटांची सोय असणाऱ्या जगजीवनराम रुग्णालयात(जेआरएच) काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणत पीपीई सूटची आवश्यकता आहे; कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करणारे हे रेल्वेचे भारतातील एकमेव रुग्णालय आहे. जेआरएच मध्ये 80 हून अधिक कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय टीमसाठी पीपीई सूट सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण ठरतील. लोअर परळ कार्यशाळेतील समर्पित पथक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मापदंडानुसार आणि विशेष सिट्राने मंजूर केलेल्या कापडाने कठोर गुणवत्ता नियंत्रणाखाली दररोज 200 ते 225 सूट तयार करीत आहे. उत्पादन अधिक वाढविण्यासाठी, महालक्ष्मी कार्यशाळा जेआरएचसाठी दररोज बुटांच्या कव्हरसह 200 सूट तयार करण्यास तयार आहे. प्राणघातक कोरोना विषाणू साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत पुढे सरसावत जगजीवन राम रुग्णालयातील आघाडीच्या योध्यांसाठी पीपीई सूट तयार केल्याबद्दल पश्चिम रेल्वेने लोअर परेल कार्यशाळेच्या या प्रयत्नांना सलाम केला आहे.
Home ताज्या बातम्या पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार्यशाळेने कोरोना विषाणू साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईतील आघाडीच्या योद्ध्यांसाठी...