नवी दिल्ली, 29 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोविड -19 विरुध्द लढा देण्यासाठी काही कठोर निर्णयांचीआवश्यकता आहे याचा पुनरुच्चार करत असे कठोर निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची क्षमा मागितली आहे. आकाशवाणीवरून’ मन की बात 2.0 ‘ च्या दहाव्या भागाद्वारे ते संवाद साधत होते. भारतीय जनतेला सुरक्षित ठेवणे महत्वाचे असून एकजुटीने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आपण विजयी ठरू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लॉकडाऊनमुळे लोक आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहतील आणि यासंदर्भातल्या नियमांचे जे पालन करणार नाहीत ते अडचणीत येतील असे ते म्हणाले.लॉकडाऊनमुळे सर्वाना, विशेषतः गरिबांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याबद्दल आपल्याला दुःख वाटत असल्याची भावना त्यांंनी व्यक्त केली. जनतेसमवेत सहानुभूती व्यक्त करत, भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशात कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नव्हता. जगातली परिस्थिती पाहता ही जीवन-मृत्यूशी संबंधी परिस्थिती असल्यामुळे असा कठोर निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले.रोगाच्या सुरवातीलाच त्यावर इलाज करायला हवा नाहीतर हा रोग असाध्य होऊन त्यावरचा उपचार अतिशय कठीण होतो अशा अर्थाचे ‘एवं एवं विकारः, अपि तरून्हा साध्यते सुखं’ हे वचन पंतप्रधानांनी सांगितले. कोरोनाचा संपूर्ण जगाला तडाखा बसत आहे. ज्ञान, विज्ञान, गरीब, श्रीमंत, बलवान, दुर्बल अशा सर्वांसाठीच कोरोना आव्हान ठरला आहे. कोरोनाला देशाची सीमा किंवा प्रदेश यासह कोणतेच बंधन नाही. मानवजातीसमोर उभ्या ठाकलेल्या या संकटाचा सामना, मानव जगताने एकजुटीने करायला हवा. लॉकडाऊनचे पालन करणे म्हणजे केवळ इतरांना मदत इतकेच नव्हे तर स्वतःचे रक्षण करण्याचाही हा मार्ग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या दिवसात लक्ष्मण रेषेचे पालन करत स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचेही रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोनाची तीव्रता समजून घेण्याचा प्रयत्न न केल्यामुळे काही लोक लॉक डाऊनचे उल्लंघन करत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा अन्यथा कोरोना विषाणू पासून आपले रक्षण करणे कठीण होईल असे पंतप्रधान म्हणाले. उत्तम आरोग्य म्हणजे भाग्याची गोष्ट असून निरोगी राहणे हाच आनंदी राहण्याचा मार्ग असल्याचे सांगणाऱ्या ‘आर्योग्यम परं भाग्यम, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनं’ या वचनाचा त्यांनी उल्लेख केला.