कामगार नेते केशव घोळवे यांच्या पाठपुराव्याला यश, एनयूएचएमच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
पिंपरी,दि. 18 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत कर्मचा-यांना किमान वेतन दरानुसार पुर्वलक्षी प्रभावाने वेतन द्यावे, असे केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सतिश पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना पत्राव्दारे कळविले आहे. तसे आदेशाचे पत्र किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य व भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नगरसेवक केशव हनुमंत घोळवे यांनी मंगळवारी (दि. 17 मार्च) मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावेळी एनयूएचएम कामगार प्रतिनिधी अक्षय बाणेकर, सागर हानवते, प्रदीप मोहिते, रवी चौरे, उमेश रापार्ती, राहुल पावरा आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (National Urban Health Mission – NUHM) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांवर 140 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही, तर सरासरी मासिक सहा हजार ते दहा हजार रुपये एवढे तुटपूंजे मानधन देण्यात येत आहे. त्यामुळे त्या कर्मचा-यांची आर्थिक, कौटूंबिक, सामाजिक कुचंबणा होत होती. या कर्मचा-यांच्या वतीने मागील एक वर्षापासून किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य व भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नगरसेवक केशव हनुमंत घोळवे हे केंद्रीय श्रम मंत्रालयात पाठपुरावा करीत होते. याबाबत घोळवे यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांना प्रत्यक्ष भेटून एनयूएचएम कर्मचा-यांना किमान वेतन श्रेणी मिळावी व पुर्वलक्षी प्रभावाने फरक मिळावा या मागणीचे पत्र दिले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन, महाराष्ट्र राज्य श्रम व कामगार विभाग मंत्रालय, किमान वेतन सल्लागार मंडळ आणि केंद्रीय श्रम मंत्रालयाचे अधिकारी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर 14 मार्च 2020 रोजी केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांच्या आदेशाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सतिश पवार यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना आदेश दिले आहेत, तसे पत्र घोळवे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त हर्डीकर यांना दिले.
या आदेशामुळे एनयूएचएम अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करणा-या सन 2019-20 च्या मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा नुसार वैद्यकिय अधिकारी पूर्णवेळ, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक गुणवत्ता आश्वासक, स्टाफनर्स, एएनएम, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल व मदतनीस या पदांवर 140 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सरासरी फक्त मासिक सहा हजार ते दहा हजार रुपये एवढे अल्प मानधन मिळत होते. आता नविन किमान वेतन दरानुसार पुर्वलक्षी प्रभावाने वेतन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना सरासरी 22,600 ते 25,900 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. एनयूएचएम कर्मचा-यांचे मानधन सुसूत्रीकरणाची कार्यवाही सुरु आहे. सद्यस्थितीत या कर्मचा-यांना मिळणारे वेतन हे किमान वेतन कायद्यात नमुद पेक्षा कमी असल्यास सुसूत्रीकरणानुसार वेतन देण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत वेतनातील फरक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. अशी माहिती नगरसेवक केशव घोळवे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांनी त्यांना किमान वेतनाचा लाभ मिळावा यासाठी किंवा वेळेत व थकलेले वेतन मिळावे यासाठी किमान वेतन सल्लागार मंडळ सदस्य केशव हनुमंत घोळवे (फोन नं. 9881257925, 7887887951 किंवा ईमेल – keshavgholave78@gmail.com,) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.